मंडणगडच्या विकासाकरिता नियोजित प्रयत्न
By Admin | Updated: October 30, 2015 23:10 IST2015-10-29T23:52:53+5:302015-10-30T23:10:19+5:30
रवींद्र वायकर : मागासलेपणाचा अनुशेष भरून काढणार

मंडणगडच्या विकासाकरिता नियोजित प्रयत्न
मंडणगड : मंडणगड तालुक्याचा मागासलेपणाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पायाभूत सुविधांसह पर्यटनस्थळाच्या विकासासाठी नियोजित प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले.
नगरपंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मंडणगड येथे आलेल्या पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपायांची माहितीही दिली. मंडणगड शहराचा विकास आरखडा येथील शहरातील मतदारांच्या गरजा लक्षात घेऊन बनविण्यात येईल. मतदारांनी सेनेला सत्ता दिल्यास आगामी पाच वर्षात मंजूर आरखडा पूर्ण करण्यात येईल. यात पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पाणीप्रश्न अग्रक्रमाने सोडवण्यात येणार असल्याचे सांगितले.
शहराला तालुक्यातील विजेच्या व्होल्टज प्लक्च्युऐशनच्या समस्येवर मात करण्यासाठी थ्री फ्रेज कनेक्शन व शहरात वीजपुरवठा करण्यासाठी अंडरग्राऊंड केबलने जुने व नादुरुस्त पोल बदलण्यासाठी तालुक्यात विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात ९ तालुक्यातील बसस्थानकांमध्ये सर्व सोयीसुविधा असाव्यात. त्यांचे नूतनीकरण व्हावे, यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीस दलाच्या मागणीनुसार प्रत्येक तालुक्यातील सर्व चेकपोस्टमध्ये सीसीटीव्ही लावण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद बजेटमध्ये केली असल्याचे सांगितले.
म्हाडाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात जागा खरेदी करून सर्वसामान्यांना परवडू शकतील, असे गृह प्रकल्प साकरण्यासाठी नियोजन सुरु असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
तालुक्यातील किल्ले मंडणगड बाणकोट व आंबेडकरांचे मूळ गाव आंबडवे यांच्या पर्यटन विकास आरखाड्यातून निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, शिल्प, लेण्या, देवस्थाने, जागृत देवस्थाने यांचे संरक्षण व संवर्धन यासाठी राज्य शासनाला पुरातत्व खात्याच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन देताना पर्यटन व्यवसायाच्या वृ्ध्दीसाठी रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी सेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार सूर्यकांत दळवी, उपजिल्हाप्रमुख राजकुमार निगुडकर, तालुकाप्रमुख संतोष घोसाळकर, संतोष गोवळे, उपसभापती आदेश केणे, किशोर देसाई, शशिकांत मोदी, संदीप राजपुरे, अण्णा कदम, राजेंद्र फणसे, भगवान घाडगे, प्रताप घोसाळकर, रघुनाथ पोस्टुरे, दोस्त चौगुले यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वायकरांची खंत : विकास रखडलेलाच
गेल्या अनेक वर्षात अगदी स्वातंत्र्यानंतरही मंडणडचा विकास म्हणावा तेवढा झालेला नाही, याबद्दल खंत व्यक्त करून वायकर यांनी भविष्यात राज्य शासनाच्या माध्यमातून या शहरात विविधांगी कामे नियोजित पध्दतीने मार्गी लावणार असल्याचे सांगितले. मंडणगड येथे आता नगरपंचायत झाली आहे. त्यामुळे शहरासाठी विकासाचे मार्ग खुले झाले आहेत, असे वायकर यावेळी बोलताना म्हणाले.
आराखडा पूर्ण करणार
मंडणगड नगरपंचायतीत शिवसेनेला सत्ता मिळाल्यास आगामी पाच वर्षांचा विकास आराखडा बनवून तो पूर्ण करण्यात येर्ईल, असे वायकर म्हणाले.