नळयोजना पूर्णत्वास जाणार

By Admin | Updated: December 2, 2014 00:24 IST2014-12-01T22:26:14+5:302014-12-02T00:24:00+5:30

कुडाळमधील प्रश्न : पाणीपुरवठा समिती सभेत माहिती

The plan will be complete | नळयोजना पूर्णत्वास जाणार

नळयोजना पूर्णत्वास जाणार

कुडाळ : कुडाळ ग्रामपंचायतीच्या ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची सभा समितीचे अध्यक्ष काका कुडाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात झाली. या सभेत स्वच्छ भारत अभियान मंजूर असलेली सुधारीत नळ योजना पूर्णत्वास नेणे, उद्भव विहीर पुनर्बांधणी कुडाळ दत्त नगर येथे विंधन विहीर, सौर वीज पंप, लघू नळ योजना, शहरातील कचरा व्यवस्थापन, भंगसाळ नदी पात्रातील साठलेला गाळ काढणे वगैरे महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा करण्यात आली. यावेळी कुडाळ नळयोजनेच्या अपूर्ण कामांना आता गती येणार असून कुडाळ शहराला कायम पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.
सध्या संपूर्ण देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून कुडाळमध्ये स्वच्छता अभियान राबविणे याबाबत चर्चा करण्यात आली. या दृष्टीने वॉर्ड निहाय ग्रामपंचायत सदस्यांची समिती गठीत करून अभियान राबविण्यात यावे. शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी डसबीन ठेवण्यात आल्यास लगतच्या रहिवाशांना या डसबीनचा वापर करता येईल व रस्त्यावर इतरत्र कचऱ्याचे ढीग साचणार नाहीत. तसेच रस्त्यावरील असलेला कचराकुंडीत साठवावा व साठलेला कचरा वेळच्यावेळी नियमित उचलून स्वच्छता कशी राखता येईल, याचे नियोजन करण्याबाबत ग्रामपंचायतला शिफारस करण्यात आली. शहरात सार्वजनिक सुलभ शौचालयाची गरज लक्षात घेता शासनाची डॉन बॉस्को नजीक असलेल्या पोकळीस्त जागेत सुलभ शौचालय होण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे ठरले.
कुडाळ दत्तनगर वसाहतीमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सन २०१४-१५ अंतर्गत विंधन विहिरीवर दुहेरी पंप योजना कार्यान्वित करण्याच्या प्रस्तावास मंजुरी असलेली असून ही योजना कार्यान्वित करण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया करून योजना कार्यान्वित करण्याचे ठरले.
भंगसाळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे तसेच बंधारा लिकेज असल्याने फळ्या घालूनही उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचा साठा नदीपात्रात राहत नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून भुगर्भातील पाण्याची पातळी खाली जाऊन उन्हाळ्याच्या दिवसात परिसरातील विहिरी कोरड्या पडतात. यासाठी या नदीपात्रातील गाळ काढणे व बंधारा दुरुस्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करण्याचे ठरले. या सभेस सरपंच स्रेहल पडते, ग्रामपंचायत सदस्य नंदिनी कुडाळकर, अदिती सावंत, शैला बक्षी, शरयू जळवी, समिती सदस्य सुरेश राऊळ, सदानंद अणावकर, ग्रामविकास अधिकारी बी. डी. पिंटो आदी उपस्थित होते. काका कुडाळकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा
निधीच्या कमतरतेमुळे मंजूर असलेली नळ योजना पूर्णत्वास गेलेली नाही. ती पूर्ण करणे व नळयोजनेची उद्भव विहीर पुनर्बांधणी करणे ही कामे सन २०१४-१५ च्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हा परिषदेकडे प्रस्तावित करण्यात आलेली होती. या कामांना सन २०१४-१५ च्या आराखड्यात मान्यता मिळालेली असून उद्भव विहीर व पंपगृह बांधणे यासाठी ५० लक्ष व योजनेची अपूर्ण कामे करण्यासाठी ३० लक्ष असे एकूण ८० लाखाच्या आराखड्यास मान्यता मिळाली असून सुधारीत नळ योजनेची भरणा करण्याची लोक वर्गणीची रक्कम २६.८० लाख महाजीवन प्राधिकरणकडे पूर्णपणे भरणा केल्यामुळे प्राधिकरणामार्फत सुधारीत नळ योजनेची अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कुडाळची रखडलेली नळ योजना लवकरच पूर्ण होणार असून मार्गी लागणार आहे. त्यामुळे शहरातील साठवण टाक्यांमार्फत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास समितीचे अध्यक्ष काका कुडाळकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांचे विशेष आभार सभागृहात मांडले व त्यांच्या सहकार्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्याचे सांगितले. मंजूर प्रस्तावांतर्गत अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचातीने पाठपुरावा करण्याचे ठरले.

Web Title: The plan will be complete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.