नीतेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक
By Admin | Updated: July 16, 2014 01:03 IST2014-07-16T01:01:16+5:302014-07-16T01:03:32+5:30
एकजण जखमी : वातावरण तंग; सुमोचेही नुकसान, ओरोस रानबांबुळीनजीकची घटना

नीतेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक
सिंधुदुर्गनगरी : स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेकीचा प्रकार मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. कणकवलीतून मालवणकडे जाताना ओरोस रानबांबुळीनजिक झालेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली.
या दगडफेकीत नीतेश राणे यांच्या ताफ्यातील सुमो गाडीची काच फुटली असून यामध्ये संतोष सोमा राऊत (वय २६) हा जखमी झाला आहे. त्याला ओरोस येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर नीतेश राणे यांच्याकडून नजिकच्या ओरोस पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. नीतेश हे कणकवली येथून मालवणकडे जाताना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कसाल-मालवण रस्त्यावर ओरोस रानबांबुळीनजिक त्यांच्या ताफ्यातील गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक झाली. मात्र नीतेश असलेल्या गाडीच्या चालकाने प्रसंगावधान राखत मार्ग बदलल्याने ताफ्यामागे मागे असलेल्या गाडीवर काही दगड आदळले. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही.
दरम्यान, रात्री उशिरा घडलेल्या या घटनेचे वृत्त कळताच ओरोस पोलीस ठाणे परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गाडीवर दगडफेक करणाऱ्या सात-आठ व्यक्ती असल्याचे समजते. (प्रतिनिधी)