ठसेतज्ज्ञांना अपयश
By Admin | Updated: March 12, 2015 00:03 IST2015-03-11T23:18:25+5:302015-03-12T00:03:31+5:30
बांदा चोरीप्रकरण : स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण

ठसेतज्ज्ञांना अपयश
बांदा : बांदा मुस्लिमवाडी येथे घरफोडी झालेल्या घरालगत रात्रीच्या सुमारास अनोळखी व्यक्ती फिरताना आढळल्याने स्थानिकांनी सतर्कता दाखवत या युवकाचा पाठलाग केला. मात्र, काळोखाचा फायदा घेत त्याने आपल्या साथीदारासह दुचाकीवरुन गोव्याच्या दिशेने पलायन केले. बांदा पोलिसांनी स्थानिकांच्या सहाय्याने पत्रादेवी हद्दीपर्यंत या तरुणांचा पाठलाग केला. मात्र, ते सापडू शकले नाहीत. चोरीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा संशयित याठिकाणी फिरकल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी रत्नागिरी येथून ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. मात्र, चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूंवर स्पष्टपणे ठसे उमटले नसल्याने यातून ठोस काही निष्पन्न झाले नाही. बांदा देऊळवाडी व मुस्लिमवाडीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी मुस्लिमवाडी येथील व कामानिमित्त मुंबई येथे असलेले मुजिदुल्ला इस्माईल शेख यांनी आपल्या बंद घरातून २७ हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार दिली आहे. तसेच नवाज सादिक खान यांनी पैसे व सोन्याच्या वस्तूंसह चार हजार रुपये किमतीचा मोबाईलही चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नवाज खान यांच्या घरालगतच्या अनोळखी व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना त्यांच्या घरातील महिलेने पाहिले. या युवकाचा चेहरा झाकलेला असल्याने तिने याबाबत आरडाओरडा केली असता त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्याने याठिकाणाहून पलायन करत बांदेश्वर मंदिरानजीक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर वाट पाहत असलेल्या आपल्या साथीदारासह पलायन केले.पोलीस हवालदार रमेश नारनवार यांच्यासह स्थानिकांनी त्याचा गोवा हद्दीलगत पत्रादेवीपर्यंत पाठलाग केला. मात्र, काळोखाचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. याबाबत पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर यांनी बांदा शहरात नाकाबंदी करत याची कल्पना लगतच्या गोवा पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)
बांदा शहरात गस्त वाढविली
संशयित पुन्हा याठिकाणी आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे चोरटे हे स्थानिकच असल्याचा संशय बळावला आहे. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पलायन करावे लागले. रत्नागिरी येथील ठसेतज्ज्ञ यु. एस. साळुंखे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूंवर स्पष्टपणे ठसे न उमटल्याने विशेष काही हाती लागले नाही. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरात रात्र गस्त वाढविण्यात आली असून लवकरच संशयितांना जेरबंद करण्यात येणार असल्याचे बांदा पोलिसांनी स्पष्ट केले.