छायाचित्रकार निसर्गाचे सौंदर्य खुलवतो
By Admin | Updated: August 19, 2014 23:52 IST2014-08-19T22:34:46+5:302014-08-19T23:52:29+5:30
संतोष कांबळी : कणकवलीत छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

छायाचित्रकार निसर्गाचे सौंदर्य खुलवतो
कणकवली : निसर्ग हा अद्भुत घटक आणि सौंदर्यानी भरलेला आहे. ते सौंदर्य सर्वांसमोर आणण्याचे काम छायाचित्राच्या माध्यमातून होत असते. छायाचित्रकार हा निसर्गाच्या सौंदर्याचा वेगळा साक्षीदार ठरतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार संतोष कांबळी यांनी केले. नगरवाचनालय सभागृहात गंधर्व फाऊंडेशनतर्फे आयोजित छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अभय खडपकर, अशोक करंबेळकर, गंधर्व फाऊंडेशनचे संतोष सुतार, संगर महाडिक, किशोर सोगम, गिरीश सावंत, एम.एम.मुल्ला, नितीन सावंत, तुळशीदास कुडतरकर, मोहन पडवळ आदी उपस्थित होते. सह्याद्रीचा निसर्ग आणि जैवविविधता या विषयावरील स्पर्धेतील आणि गिरीश सावंत यांची ‘इन डार्क’ या थीमवरील छायाचित्रे प्रदर्शनात लावण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळावे यासाठी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्गातील वैशिष्टयांना सर्वांसमोर आणण्यासाठी यापुढेही अशीच स्पर्धा घेण्यात येईल, असे खडपकर यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्र स्पर्धेतील मुक्त गटात बांदा येथील रोहित कशाळीकर यांच्या छायाचित्राला प्रथम, कणकवलीतील विनोद दळवी यांच्या छायाचित्राला द्वितीय क्रमांक मिळाला. छंद गटात सावंतवाडी येथील डॉ.साईनाथ पित्रे यांचा प्रथम, तळवणे येथील वर्षा परांजपे यांच्या छायाचित्राला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
मालवणी काव्यलेखन स्पर्धेत वागदे येथील राजस रेगे यांच्या ‘पावणेर’ कवितेला प्रथम, सावंतवाडीतील किशोर वालावलकर यांच्या ‘ईस्माईल ठाकूर’ या कवितेला द्वितीय तर देवगड येथील मंदाकिनी गोडसे यांच्या कवितेला तृतीय क्रमांक मिळाला. वायंगणी येथील ललिता जोशी यांची ‘सड्यावरचो देवचार’ आणि नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील रंजिता दळवी हिच्या ‘शेतकऱ्याचा गाऱ्हाणा’ या कवितेला उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. (प्रतिनिधी)