करटेल गावात भातशेतीचे नुकसान
By Admin | Updated: November 9, 2014 23:34 IST2014-11-09T21:37:15+5:302014-11-09T23:34:04+5:30
जंगलातून रानटी डुकरांनी दररोज रात्री भातशेतीत घुसून नासधूस

करटेल गावात भातशेतीचे नुकसान
कुंभाड : खेड तालुक्यातील आदर्श गाव करटेलमधील भातशेती रानटी डुकरांनी नष्ट केली आहे. करटेल गावापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील जंगलातून दररोज रात्री भातशेतीत घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे़
खेड शहरापासून ५ किलोमीटर अंंतरावर असलेल्या गावातील श्रीकांत तुकाराम चव्हाण यांची दोन एकरातील भातशेती हातातोंडाशी आली होती. मात्र, ही भातशेती पेंढ्यासह या डुकरांनी नष्ट केली आहे़ या शेतीचे हजारो रूपयांचे नुकसान झाले आहे़ डुकरांनी भात तर शिल्लक ठेवले नाहीच, तर भाताचा पेंढादेखील खाऊन फस्त करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. गेले दोन महिने येथील रानातील ही डुकरे दररोज गावातील या भातशेतीमध्ये येत आहेत.
गावठी बियाण्यांपासून पाच प्रकारच्या भातबियाण्यांचा या भातशेतीमध्ये यावर्षी प्रयोग करण्यात आले होता. गावातील अन्य शेतकऱ्यांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही़ परतीच्या पावसाने या भातपिकाचे काहीअंशी नुकसान केले होते़ सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाल्याने उभी भातशेती आडवी झाली होती. त्यातच पाऊस झाल्याने भातपीक रूजले होते़
शेतीतील भाताचे पीक हातामध्ये येण्याची शक्यता कमी होती. गतवर्षीच्या तुलनेत ही भातशेती नगण्य असल्याने अगोदरच शेतकऱ्यांचे मनोबल कमकुवत झाले होते. अशातच रात्रीच्या सुमारास या जंगलातून डुकरांनी आपली हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून हे डुक्कर या भातशेतीत घुसून दररोज नासधूस करीत आहेत़ यामुळे गावातील २० शेतकरी हताश झाले आहेत. याबाबत येथील वन अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील शेतकरी करीत आहेत. अखेर नाईलाज झाल्यानंतर शेतकऱ्यांनी येथील कृषी अधिकाऱ्यांना वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे़ त्यांनी पंचनामा करून नुकसानाची माहिती घेतली. या नुकसानभरपाईचे आश्वासन दिले आहे. लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. (वार्ताहर)