कुडाळात वाहतूक कोंडीला पूर्णविराम

By Admin | Updated: September 5, 2014 00:18 IST2014-09-04T23:07:36+5:302014-09-05T00:18:03+5:30

गणेशोत्सवातील नियोजन : पोलिसांच्या कार्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान

Period of traffic control in the Kudalas | कुडाळात वाहतूक कोंडीला पूर्णविराम

कुडाळात वाहतूक कोंडीला पूर्णविराम

रजनीकांत कदम - कुडाळ -कुडाळातील वाहतूक कोंडीच्या समस्यांचे निवारण कुडाळ पोलिसांनी नुसता निर्णय घेऊ न नाही, तर ठोस उपाययोजना करून यशस्वीपणे पार पाडल्याने या गणेश चतुर्थी सणाच्या काळात वाहतुकीची कोंडी झाली नाही. त्यामुळे अनेक त्रासापासून चाकरमानी, नागरिक व वाहन चालकांची सुटका झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या या कार्याबाबत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही जोरदार गणेश चतुर्थीचा उत्साह असून मोठ्या प्रमाणात या सणासाठी चाकरमानी आपल्या गावी दाखल झाले आहेत. याच धर्तीवर या सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी नागरिक तसेच चाकरमान्यांची कुडाळ बाजारात झुंबड उडत असते. याच वेळी चतुर्थी सण चालू होण्याअगोदर चार ते पाच दिवसांपासून ते अकरा दिवसांपर्यंत ही गर्दी वाढतच असते.
या बाजाराला येणाऱ्या माणसांच्या गर्दीबरोबरच मोठ्या प्रमाणात वाहनांचीही गर्दी वाढत असते. त्यातच कुडाळ बाजारपेठ, बसस्थानक तसेच शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणीही वर्षाचे बाराही महिने वाहतुकीचा खोळंबा होत असतो. गणेश चतुर्थी सणामध्ये बाजारपेठेत दरवर्षी वाहतूक खोळंबल्यामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो.
येणाऱ्या सणाच्या वेळी जनतेला काहीही त्रास होऊ नये, या दृष्टीने कुडाळचे प्रांताधिकारी रवींद्र बोंबले, तहसीलदार जयराज देशमुख, पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार या महसूल तसेच पोलीस विभागाच्या प्रमुखांनी कुडाळातील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या शांतता समितीची सभा गणेश चतुर्थीच्या अगोदर आयोजित केली होती. या सभेमध्ये कुडाळवासीयांनी शहरातील वाढती अतिक्रमणे व वाहतुकीच्या समस्यांचे निवारण करा, अशी मागणी केली होती.
जनतेच्या या मागणीचा विचार व गणेश चतुर्थी सणामध्ये कोणालाही त्रास होऊ नये, यादृष्टीने कुडाळचे पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी येथील वाहतुकीची होणारी समस्या सोडविण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या या निर्णयामुळे गणेश चतुर्थी सणाच्या अगोदरपासून ते आतापर्यंत शहरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या पूर्णपणे सुटली आहे. पोलीस निरीक्षक बिराजदार यांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुडाळ एसटी स्थानकात येणाऱ्या एसटी बसेसचा जाण्यायेण्याचा मार्ग एकेरी केला. रस्त्याच्या कडेला पांढऱ्या पट्ट्यांच्या बाहेर गाड्या पार्क कराव्यात. रस्त्यावर गाडी उभी केल्यास दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जास्तीत जास्त खासगी गाड्या या शहरातून न आणता बाहेरच्या मार्गाने जाऊ दिल्या. बाजारपेठेमध्ये गर्दीच्या व बाजाराच्या दिवशी वाहतूक पूर्णपणे बंद, तर इतर दिवशी एकेरी वाहतूक केली. शहरातील आवश्यक त्या ठिकाणी दिवसभर पोलीस कर्मचारी तैनात ठेवले. खासगी चार चाकी गाड्या मुख्य रस्त्यावर पार्क न करता त्याऐवजी पार्किंग जागेत पार्क करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. शहरातील वाहतूक कुठून, कशी असणार याचा नकाशा असणारे मोठे बॅनर शहरात आवश्यक त्या ठिकाणी कुडाळ पोलिसांच्यावतीने लावण्यात आले.

कुडाळवासीयांकडून कौतुक होणे गरजेचे
एरवी चांंगल्या घटना, गोष्टी घडल्या, तर कुडाळातील सर्व क्षेत्रातील नागरिक संबंधितांचे कौतुक करतात. त्याचप्रमाणे शहरातील सर्वात क्लिष्ट अशी वाहतूक समस्या निदान गणेश चतुर्थीच्या कालावधीत सोडविल्याने कुडाळ पोलिसांचे कुडाळवासीयांनी कौतुक करायला हवे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या कुडाळ पोलिसांनी येथील वाहतूक समस्या सोडवून गणेशभक्त, नागरिक, वाहनचालक यांना मोठ्या त्रासापासून वाचविल्यामुळे गणेशभक्त व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. वाहतूक समस्या निवारण्यासंदर्भात कुडाळ पोलिसांनी केलेले नियोजन योग्य आहे. पुढेही अशीच प्रक्रिया सुरू ठेवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Period of traffic control in the Kudalas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.