‘हायटेक’सह लोकसंस्कृतीही

By Admin | Updated: October 7, 2014 23:53 IST2014-10-07T22:20:46+5:302014-10-07T23:53:36+5:30

प्रचार रंगीला रेऽऽ : भजनासह पथनाट्यांना आलाय जोर

People's culture with 'hi-tech' | ‘हायटेक’सह लोकसंस्कृतीही

‘हायटेक’सह लोकसंस्कृतीही

विहार तेंडुलकर -रत्नागिरी प्रचारसभांच्या तोफा अजून म्हणाव्या तशा धडधडू लागलेल्या नाहीत. त्यामुळे हायटेक प्रचाराला जोर आला आहे. वॉटस्अप, फेसबुक, टिष्ट्वटरच्या माध्यमातून प्रचार केला जात असताना दुसरीकडे लोकसंस्कृतीही जागवली जात
आहे. जिल्ह्यातील दापोली, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, राजापूर या पाचही मतदारसंघात सध्या घरगुती प्रचाराचा जोर आहे. सध्या वॉटस्अप, फेसबुक ही माध्यमे शहरी भागापासून ते ग्रामीण भागातील तरूणांपर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे सध्या अनेक उमेदवारांनी याचाही आधार घेतला आहे. या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक पक्षाने त्यांच्यातील तरूण कार्यकर्त्यांकडे या हायटेक प्रचाराची जबाबदारी दिली आहे. नवमतदारांबरोबरच तरूण मतदारांकडे यंदा प्रत्येक पक्षाने लक्ष पुरवले आहे. त्यामुळे हा मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी सध्या विविध पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.
ग्रामीण भागातील प्रौढ आणि वृध्द मतदारांना आपलेसे करण्यासाठी आता उमेदवारांनी आणखी एक शक्कल लढवली आहे. पथनाट्य, प्रचाररथ, भजनासह वाद्यवृंद अशा जुन्या लोककलांचाही आधार घेतला जात आहे.
राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी प्रचाररथाव्दारे आपला प्रचार सुरू ठेवला आहे. गुहागर विधानसभेतील राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रचार सुरू केला आहे. काही उमेदवारांनी लावणी, तमाशाचाही प्रचारासाठी आधार घेतला आहे.
रस्त्याच्या कडेला ही कला सादर करण्यात येत असल्याने त्याठिकाणी उत्सुकतेपोटी लोक गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे हा प्रचार मतदारांच्या पचनी पडेल, अशी वेडी आशा उमेदवार बाळगून आहेत.

काँग्रेसचा सांस्कृतिक सेल
लोकसंस्कृतीपर प्रचार करण्यासाठी काँग्रेसने सांस्कृतिक सेल स्थापन केला आहे. या सेलचे कलाकार काँग्रेसच्या प्रत्येक उमेदवाराचा प्रचार करणार आहेत. जनरेटर, स्पीकर फिक्स करून ठेवलेल्या प्रचार रथावर हे कलावंत आपली कला पेश करून प्रचार करणार आहेत. या कलावंतांकडून एका दिवसात किमान दोन कार्यक्रम करून घ्यावेत, असे स्थानिक पक्ष पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

मुंबईची पथकेही कोकणात
मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या पथकांना निवडणुकीमुळे चांगले दिवस आले आहेत. या पथकांनी आता कोकण गाठले असून, विविध पक्षांच्या माध्यमातून या पथकांनी लोककलांचा आधार घेऊन प्रचार चालवला आहे. गुहागर तालुक्यातील गुहागर, शृंगारतळी अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये या पथकाचे कार्यक्रम सुरू आहेत.

Web Title: People's culture with 'hi-tech'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.