बाहेरच्या माणसांनीच कोकणचा उठविला लाभ
By Admin | Updated: December 31, 2015 00:29 IST2015-12-30T22:19:57+5:302015-12-31T00:29:03+5:30
महेंद्र नाटेकर : कणकवलीतील स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीच्या सभेत प्रतिपादन

बाहेरच्या माणसांनीच कोकणचा उठविला लाभ
कणकवली : धरणे, पाटबंधारे झाले, चौपदरी महामार्ग झाला, इंजिनिअरिंग, मेडिकल महाविद्यालये झाली, उद्योगधंदे आले व कोकणी माणसाला वंचित ठेवून बाहेरच्या माणसांनी लाभ उठवला. कोकण विकास झाला असे म्हणता येणार नाही. कोकण विकास म्हणजे कोकणी माणसांचा विकास आणि असा विकास स्वतंत्र कोकण राज्यातच होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले.
कणकवली येथील वृक्षमित्र हॉलमध्ये स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघर्ष समितीची सभा आयोजित केली होती. यावेळी नाटेकर बोलत होते. वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, मोतीराम गोठीवडेकर, संजय हंडोरे, सुरेश हाटे उपस्थित होते.
नाटेकर म्हणाले की, आज ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या लोकांची होते. स्वतंत्र राज्य असल्यास गोव्याप्रमाणे १०० टक्के नोकरभरती कोक णी तरुणांचीच होईल. ९० टक्के नोकरभरती घाटावरच्या बेरोजगारांची होत असल्याने कोकणातील एस.टी., एन.टी., ओ.बी.सी. आदी मागासवर्गीयांना याचा लाभ होत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळाले तरी या आरक्षणापासून कोकणातील मराठे वंचित राहणार. कोकणात औष्णिक, आण्विक इत्यादी विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ घातले आहेत. त्याच्या विरुद्ध आंदोलने केली जात आहेत. तरी विनाशकारी प्र्रकल्प सुरूच आहेत. सुरूच राहणार! परराज्यातील मच्छिमार कोकणात येऊन कोकणी मच्छिमारांना उद्ध्वस्त करून माशांची लूट करत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पाठींब्यानेच हे सारे घडत आहे. केंद्र सरकार राज्य शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय विनाशकारी प्रकल्प आणूच शकत नाही. हे प्रकल्प रोेखायचे असतील तर स्वतंत्र कोकण राज्यच पाहिजे.
यावेळी वाय. जी. राणे, शिवाजी देसाई, सुभाष गोवेकर, संजय हंडोरे यांनी भाषणे केली. सुरेश हांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)