जिल्ह्यात ६५ लाखाची नुकसान भरपाई अदा

By Admin | Updated: October 27, 2015 23:58 IST2015-10-27T23:35:34+5:302015-10-27T23:58:58+5:30

जिल्हा प्रशासन : पडझडीच्या नुकसानापोटी रक्कम प्राप्त; जून - सप्टेंबरमधील नुकसान

Pay the loss of 65 lakhs in the district | जिल्ह्यात ६५ लाखाची नुकसान भरपाई अदा

जिल्ह्यात ६५ लाखाची नुकसान भरपाई अदा

रत्नागिरी : यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने जिल्ह्यात काही ठिकाणी पडझड झाली तर काही बळीही घेतले. या नुकसानाची दखल शासनाकडून घेण्यात आली असून, मृतांच्या वारसांना तत्काळ भरपाई देण्यात आली आहे. तसेच पडझडीच्या नुकसान भरपाईपोटी ६५ लाख रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाला आत्तापर्यंत तीन टप्प्यात प्राप्त झाली आहे. या रकमेचे वितरण सर्व तालुक्यांना करण्यात आले आहे.
१ जून ते सप्टेंबर २०१५ अखेरपर्यंत जिल्ह्यात पडलेल्या वादळी पावसाने काही ठिकाणी घरे, गोठे तसेच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. काही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. या पावसात झालेल्या नुकसानाची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यात मृत झालेल्या ९ व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी चार लाखांप्रमाणे एकूण ३६ लाख रुपयांचे वाटप तत्काळ करण्यात आले.
या वादळी पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पडझड झाली. या कालावधीत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची संख्या ६ असून, त्यापैकी चार घरांना ३,०१,४५० रुपये एवढी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अंशत: नुकसान झालेल्या १२५ घरांपैकी पात्र ३५ घरांना ७२,२३५ रुपये एवढी मदत देण्यात आली आहे. ५९६ कच्च्या घरांपैकी पात्र २१९ घरांना १,९७,५०० इतकी भरपाई देण्यात आली. तसेच बाधित ७५ गोठ्यांपैकी पात्र २५ गोठ्यांना १६,१५० रुपये भरपाई देण्यात आली आहे.
या कालावधीत झालेल्या चक्रीवादळ, पुरामध्ये ४७ सार्वजनिक मालमत्तांच्या नुकसानीचे २६,६२,१७९ रुपये, तर २५ खासगी मालमत्तांच्या नुकसानीचे ११,९३,७९६ अशी एकूण ३८,५५,९७५ रुपयांच्या नुकसानाची नोंद प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मात्र, अद्याप याच्या भरपाईची रक्कम देण्यात आलेली नाही.
तसेच अनेक भागात वीज पडल्याने व्यक्ती, जनावरे मृत झाली. या कालावधीत जिल्ह्यातील १९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मालकांनाही अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही.
या कालावधीत पडझड झालेल्या घरांपैकी पात्र ठरलेल्या ११३ घरांच्या दुरूस्ती व पुर्नबांधणीसाठी शासनाने दिलेल्या भरपाईच्या रकमेपाटी आतापर्यंत ६५ लाखांचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.
या नुकसानभरपाई निधीचे वाटप संबंधित तालुक्यांना करण्यात आले आहे. यापैकी १० लाख, २० लाख आणि ३५ लाख अशी एकूण ६५ लाख भरपाईची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे आली असून, तीचे सर्व तालुक्यांतून लवकरच वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)


मदत नाही : १९ जनावरांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात जून, सप्टेंबर या कालावधीत चक्रीवादळ, पुरामध्ये ४७ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले होते. तसेच २५ खासगी मालमत्तांचेही नुकसान झाले. या नुकसानाची नोंद प्रशासनाने केली आहे. मात्र, त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. तसेच जिल्ह्यात १९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यांच्या मालकांनाही अद्याप नुकसानभरपाई देण्यात आलेली नसल्याचे दिसत आहे.


दापोलीत अधिक
जून - सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान दापोली तालुक्यात झाले आहे. यात २१५ घरांचे व २७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

Web Title: Pay the loss of 65 lakhs in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.