तिलारी प्रकल्पग्रस्त घेणार पवारांची भेट
By Admin | Updated: July 16, 2014 23:15 IST2014-07-16T23:06:56+5:302014-07-16T23:15:21+5:30
ठिय्या आंदोलन सुरूच : शरद पवारांची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

तिलारी प्रकल्पग्रस्त घेणार पवारांची भेट
दोडामार्ग : तिलारी धरणग्रस्तांचा वनटाईम सेटलमेंटचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची या प्रश्नी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांनी दिली. तिलारी धरणग्रस्तांच्या आंदोलनाला अबीद नाईक व व्हिक्टर डान्टस यांनी भेट देऊन ही माहिती सांगितल्याने धरणग्रस्तांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. तसेच धरणग्रस्तांचे शिष्टमंडळ रविवारी जिल्हाध्यक्ष डान्टस यांच्यासमवेत शरद पवारांची भेट घेणार आहे.
तिलारी धरणग्रस्तांचे वनटाईम सेटलमेंटप्रश्नी ठिय्या आंदोलन गेल्या नऊ दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाने पुरती पाठ फिरविल्याने आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी या आंदोलनाला व्हिक्टर डान्टस व अबीद नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भ्रमणध्वनीवरून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याशी संपर्क साधला. पवार यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. दरम्यान, तिलारी धरणग्रस्थांचे आंदोलन सुरूच असून रविवारी तिलारी प्रकल्पग्रस्थांचे शिष्टमंडळ शरद पवार यांच्याशी भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)