सुविधांअभावी रूग्ण बेजार
By Admin | Updated: October 1, 2015 00:28 IST2015-09-30T23:01:56+5:302015-10-01T00:28:30+5:30
उपजिल्हा रुग्णालय : महागड्या औषधांमुळे होतेय धावपळ

सुविधांअभावी रूग्ण बेजार
दापोली : येथील उपजिल्हा रूग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुमार सुविधांमुळे रूग्णांमध्ये दिवसेंदिवस नाराजी वाढीस लागली आहे. रूग्णाची आर्थिक परिस्थितीचा विचार न करता त्याला बाहेरून महागडी औषधे आणायला लावण्याच्या प्रकारानेदेखील रूग्णांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. उपजिल्हा रूग्णालयात ३५हून अधिक रूग्णखाटा असून, नेहमी रूग्णालय रूग्णांनी भरलेले असते. येथील कर्मचारीवर्ग अपुरा असल्याने अनेकदा रूग्णांजवळ खटके उडण्याचे प्रसंग घडत असतात. रूग्णांचे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांच्या कार्यबाहुल्यावर अनेक आरोप आहेत. रूग्णाला लावलेले सलाईन संपून सलाईनमध्ये रक्त येण्यास प्रारंभ झालातरी सलाईन हातापासून वेगळी होत नसल्याचा रूग्णांचा अनुभव आहे. येथील परिचारीकांना सलाईन बंद करण्यास सांगितल्यानंतर विलंबाने सलाईन बंद करण्यात येत असल्याने रक्त सलाईनमध्ये गेल्याचा अनुभव देखील रूग्ण सांगतात. येथे पिण्यासाठी असलेला पाण्याचा कुलर आतून गंजलेल्या अवस्थेत असून, याच कुलरचे पाणी रूग्णांसह नातेवाईक घेत असतात.
कुलरची नियमित स्वच्छता होत नसल्याने या पाण्यामुळे दवाखान्यातच कावीळची साथ पसरण्याची शक्यता रूग्णांकडून व्यक्त केली जात आहे. येथील शौचालय, न्हाणीघर, स्वच्छतागृहाची रोज सफाई होत नसल्याने रूग्णांना येथे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. दुर्गंधीमुळे दवाखान्यात आलेल्या रूग्णाची तब्ब्येत सुधारण्याऐवजी बिघडण्याचीच शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. रूग्णांच्या खाटांची चादर रोज बदलली जात नसल्याचा आणखीन एक प्रकार पुढे आला आहे.
त्याचप्रमाणे सकाळी, दुपारी वॉर्डमध्ये साफसफाई होत असली तरी संध्याकाळी मात्र, कचरा काढला जात नाही. यामुळे डासांचे प्रमाण दवाखान्यातच वाढीस लागले असून, रूग्णालय कर्मचाऱ्यांकडून नियमानुसार नियमित सफाईची मागणी रूग्णांकडून होत आहे.
त्याचप्रमाणे रूग्णांना आंघोळीला पाणीदेखील कमी प्रमाणात मिळत असल्याने एकंदर सर्वच सुविधांच्या बाबतीत रूग्णालय प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी रूग्णांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान रूग्णांना मुलभूत सुविधा योग्य पध्दतीने दिल्यास रूग्णांचा दवाखान्यावरचा विश्वास वृध्दींगत होण्यास मदत होईल अन्यथा कारभार असाच राहिल्यास उपजिल्हा रूग्णालयात दाखल होण्यास कोणताही रूग्ण धजावणार नसल्याची स्थिती आहे.
दरम्यान उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. तुषार भागवत यांच्याजवळ एकंदर स्थितीबद्दल प्रतिक्रियेसाठी संपर्क साधला असता संपर्क झालेला नाही. यामुळे रूग्णालय प्रशासनाची बाजू अधिकृतपणे समोर आलेली नाही. (प्रतिनिधी)
सुविधा कधी?
उत्तर रत्नागिरीतील रुग्णांना जवळचे रुग्णालय असावे, यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची दापोलीत स्थापना करण्यात आली. मात्र, या रुग्णालयात आता सुविधाच नाहीत. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार होत नाहीत. महागड्या औषधांमुळे याठिकाणी आपला रुग्ण दाखल करावा का? असा प्रश्न त्यांच्या नातेवाईकांसमोर पडत आहे. या रुग्णालयाचा कारभार सुधारावा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे.