रेल्वे स्थानकात प्रवाशांचा हंगामा
By Admin | Updated: October 8, 2014 23:04 IST2014-10-08T22:16:01+5:302014-10-08T23:04:00+5:30
रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल

रेल्वे स्थानकात प्रवाशांचा हंगामा
कणकवली : चिपळूण येथील खेर्डी पुलाजवळ मंगळवारी मालगाडीचे डबे घसरल्यामुळे अपघात झाला होता. त्यामुळे रेल्वे सेवा प्रभावित झाली होती. त्याचा फटका बुधवारीही रेल्वे सेवेला बसला. एर्नाकुलम- पुणे एक्सप्रेस कणकवली रेल्वे स्थानकात तब्बल पाच तास थांबवून ठेवण्यात आल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी एकच हंगामा करीत स्टेशन मास्तरना जाब विचारला. त्यामुळे काहीकाळ वातावरण तंग बनले होते. दरम्यान, रेल्वे सुरक्षा बल तसेच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने काहीसे वातावरण निवळले.
कणकवली रेल्वे स्थानकात मंगळवारी रात्री १० वाजता पोहोचणारी एर्नाकुलम- पुणे एक्सप्रेस तब्बल पावणे दहा तास उशिराने म्हणजे बुधवारी सकाळी ७.४८ वाजता दाखल झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. ही गाडी तीन तासांहून अधिक काळ होऊनही पनवेलच्या दिशेने सोडण्यात न आल्याने रेल्वे प्रवाशी संतप्त झाले. त्यांनी स्टेशन मास्तरना जाब विचारण्यासाठी स्थानकातील केबिनमध्ये धाव घेतली.
एर्नाकुलम- पुणे एक्सप्रेसही रद्द करण्यात आली असती तर आम्हाला पर्यायी मार्गाचा अवलंब करता आला असता. मात्र, रेल्वेने हलगर्जीपणा करून प्रवाशांच्या जीविताशीच खेळ करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी डबल रेल्वे ट्रॅक तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी या प्रवाशांकडून करण्यात येत होती. मात्र, नांदगाव अथवा वैभववाडी रेल्वे स्थानकात ही गाडी उभी करून ठेवावी लागल्यास सुविधांअभावी प्रवाशांचे हाल होणार आहेत, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे होते.
त्यामुळे स्टेशन मास्तरना प्रवाशांकडून धारेवर धरण्यात आले. याबाबत माहिती समजताच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विष्णुराज यांनी मध्यस्थी करीत प्रवाशांना रेल्वे प्रशासनाची अडचण समजावून सांगितली. काहीवेळाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी पथकासह रेल्वे स्थानकात दाखल झाले. त्यांनीही रेल्वे प्रशासन व प्रवाशांशी चर्चा केली. त्यानंतर प्रवासी काहीसे शांत झाले.
मांडवी एक्सप्रेस रद्द
बुधवारी मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस तसेच दिवा पॅसेंजरसह काही गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. (वार्ताहर)