प्रवाशांचे हाल; गाड्या खोळंबल्या - : रत्नागिरी, राजापूर, कणकवली, चिपळूण, खेड स्थानकावर गाड्या थांबविल्या
By Admin | Updated: August 24, 2014 22:39 IST2014-08-24T21:38:36+5:302014-08-24T22:39:44+5:30
कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरले

प्रवाशांचे हाल; गाड्या खोळंबल्या - : रत्नागिरी, राजापूर, कणकवली, चिपळूण, खेड स्थानकावर गाड्या थांबविल्या
कणकवली/रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वीर ते करंजाडी स्थानकादरम्यान मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे ७ डबे रुळावरून घसरले. आज (रविवार) सकाळी ६.३० वाजता हा अपघात झाला. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली असून रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, कणकवली या स्थानकांवर अनेक रेल्वेगाड्या उभ्या करून ठेवण्यात आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
घसरलेले डबे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून, मार्ग मोकळा करण्यासाठी शेकडो कामगार कार्यरत आहेत. या अपघातामुळे मार्गावरील आज धावणाऱ्या १४ रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या सात एक्सप्रेस गाड्या अन्य मार्गे वळविण्यात आल्या. सायंकाळी उशिराने राज्यराणी व कोकणकन्या एक्स्प्रेस या गाड्या मुंबईच्या दिशेने सोडण्यात आल्या.
ऐन गणेशोत्सव काळातील या अपघातामुळे खळबळ माजली असून, मार्ग तातडीने मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी कोकण रेल्वे व्यवस्थापनाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रायगड विभागात पॅसेंजर ट्रेनचा मोठा अपघात झाला होता. त्यात अनेकांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतरही कोकण रेल्वेने मार्ग योग्य राखण्याबाबत दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे.
मालगाडीच्या अपघाताने कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन रद्द झाल्याने सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवर आलेल्या प्रवाशांना मनस्ताप झाला. कणकवली स्थानकात कोईम्बतूर-बिकानेर एक्स्प्रेस तीन तास उभी करून ठेवण्यात आली होती. या गाडीतील काही प्रवाशांना मुंबईत विमान पकडायचे असल्याने त्यांनी तातडीने खाजगी गाड्या पकडून जाण्याचा पर्याय निवडला. गाड्या तिकीटे रद्द करून परतण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय राहिला नाही. सायंकाळी उशिराने मुंबईच्या दिशेने राज्यराणी व कोकणकन्या एक्स्प्रेस सोडण्यात आल्या होत्या. करंजाडी येथील ट्रॅक सुरळीत झाल्यास या गाड्या पुढे सोडण्यात येतील अन्यथा अलिकडच्या स्थानकांवर उभ्या केल्या जातील, अशी रेल्वे सूत्रांनी माहिती दिली. कोकणकन्या एक्स्प्रेस उशिराने पोहोचल्यास गोव्याच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस खोळंबण्याची शक्यता आहे. एसटी विभागाकडून जादा गाड्या सोडण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. अपघातामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकात संपर्कक्रांती, मंगलासह तीन गाड्या सकाळी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांतील प्रवाशांना गाड्या का थांबविल्या हे सकाळी १० वाजेपर्यंत सांगितले नव्हते. कोकण रेल्वेच्या वागणुकीबाबत प्रवाशांनी संताप व्यक्त केला. काही प्रवाशांनी आपले आजारी असलेले नातेवाईक या संपर्क क्रांतीत असल्याचे सांगताना या अपघाताच्या घटनेमुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी नेण्यास उशिर होत असल्याची तक्रार केली. मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करण्यात आला असून २४ रोजी दुपारी ३.२० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस वरून सुटणार होती ती आता २५ रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटणार आहे. म्हणजेच ही रेल्वे ९ तास २० मिनिटांनी उशिराने सुटणार आहे. मालगाडीच्या अपघाताने कोकण रेल्वे मार्गावरील ट्रेन रद्द झाल्याने सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. कणकवली स्थानकात कोईम्बतूर-बिकानेर एक्स्प्रेस काहीवेळ उभी करून ठेवली होती. तिकीटे रद्द करून परतण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय नव्हता. सायंकाळी उशिराने मुंबईकडे राज्यराणी व कोकणकन्या एक्स्प्रेस सोडल्या आहेत. (प्रतिनिधी)
खासगी गाड्यांना पसंती
कोकण रेल्वे प्रशासनाचे रूळाचे काम सुरू असल्याने दिवसभरात चौदापेक्षा अधिक गाड्या रद्द केल्या. त्यामुळे प्रवाशांनी खासगी गाडीतून प्रवास करणे पसंत केले. काही प्रवाशांनी एसटीव्दारे मुंबई गाठली.
प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी धावली
करंजाडी येथे अपघात झाल्यामुळे रत्नागिरीकडून गेलेल्या गाड्या वीर पर्यत थांबल्या होत्या. बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र वीरपर्यत गेलेल्या प्रवाशांना खेडपर्यत आणण्यात आले. तर मुंबईहून आलेल्या गाड्या करंजाडीपूर्वी थांबविण्यात आल्याने तेथील प्रवाशांची वाहतूक महाड आगारातून सोडण्यात आलेल्या एसटीने करण्यात आली.
जादा गाड्या
अपघातामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली. त्यामुळे खेड आगारातून २० व महाड आगारातून २० जादा गाड्या कोकण रेल्वेच्या मदतीला पाठविण्यात आल्या आहेत.