सतीश सावंत यांच्यामुळेच पक्षाचा राजीनामा दिला
By Admin | Updated: September 17, 2014 22:28 IST2014-09-17T21:14:06+5:302014-09-17T22:28:28+5:30
राजन तेली यांचा आरोप

सतीश सावंत यांच्यामुळेच पक्षाचा राजीनामा दिला
सावंतवाडी : गेली २८ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही माझ्यावर अन्याय झाला आहे. सतिश सावंत यांना माझ्यामुळे पक्षात मान मिळत नसल्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात कारस्थाने रचली. त्यामुळेच काँगे्रसचा राजीनामा दिला असल्याचा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी काका कुडाळकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सतीश सावंत माझ्या विरोधात बोलतात. त्यांच्या विरोधात मलाही बरेच काही बोलता येईल. पण मला ही निवडणूक शांततेत लढवायची आहे, असेही तेली यांनी सांगितले.
कोणताही पेशा व्यवस्थित सांभाळू न शकणारी मंडळी काँग्रेसमध्ये पुढे आहेत. जनतेशी त्यांचा कुठलाही संबंध नाही, आणि हे लोक पक्षाच्या हिताचा विचार करीत नसल्याचा टोला तेली यांनी सतीश सावंत यांना लगावला. कणकवली, कुडाळ मतदारसंघात आघाडीचा धर्म पाळून राणेंना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, सतीश सावंत यांचा आघाडीत बिघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या विरोधात जे आरोप करीत आहात, ते सर्व आरोप निवडणुकीतून सतीश सावंत यांचे नाव वगळल्याने नैराश्येतून करीत आहेत, असेही तेली यांनी सांगितले. (वार्ताहर)