देशव्यापी महामोर्चात सहभागी व्हा : डान्टस
By Admin | Updated: July 20, 2015 00:06 IST2015-07-19T21:43:03+5:302015-07-20T00:06:01+5:30
सावंतवाडीत माजी सैनिक संघटनेचा मेळावा

देशव्यापी महामोर्चात सहभागी व्हा : डान्टस
सावंतवाडी : आघाडी सरकार सत्तेत असताना माजी सैनिकांनी वन रँक वन पेन्शन योजनेची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन त्यावेळी विरोधात असलेल्या भाजप सरकारने माजी सैनिकांना दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने सरकारला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी २६ जुलै रोजी दिल्ली जंतर मंतर येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग या माजी सैनिकांच्या संघटनेतर्फे देशव्यापी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष पी. एफ. डान्टस यांनी केले आहे.
सावंतवाडी येथे रविवारी इंडियन एक्स सर्व्हिसेस लिग या माजी सैनिक संघटनेच्यावतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात डान्टस यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे महाव्यवस्थापक सुनील राऊळ, दीनानाथ सावंत, शिवाजी परब, दीपक राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी डान्टस म्हणाले, देशाच्या सीमेवर रक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मागण्यांकडे सरकार गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. वन रँक वन पेन्शन, सातवा वेतन आयोग यासारख्या मागण्यांसाठी माजी सैनिक संघटना शासनाशी गेली अनेक वर्षे झगडत आहे. त्यावेळच्या विरोधी भाजपा सरकारने सत्तेत आल्यानंतर आपण हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, भाजप सत्तेत येऊन वर्ष पूर्ण झाले, तरी माजी सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. नवीन सरकारला जाग आणण्यासाठी उपोषणे, आंदोलने व पाच, सहावेळा निवेदनेही देण्यात आली. तरीही शासन दुर्लक्ष करीत आहे. माजी सैनिकांना देण्यात येणारी पेन्शन ५० हून ७० टक्के एवढी मिळाली, तर त्यांच्या कुटुंबियांना ३० टक्के मिळणारी पेन्शन ७० टक्के व्हावी, अशा अनेक प्रश्नांसंदर्भात सरकारला जागे करण्यासाठी महामोर्चाचे आयोजन केल्याची माहिती डान्टस यांनी
दिली. (वार्ताहर)