Parasuram Upkar, the traditional fishermen's leader, is always misinterpreted | पारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलच: परशुराम उपरकर
पारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलच: परशुराम उपरकर

ठळक मुद्देपारंपारिक मच्छिमारांची नेत्यांकडून कायम दिशाभूलचपरशुराम उपरकर यांची टीका

कणकवली : पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या काहीजणांनी या मच्छिमारांची कायमच दिशाभूल केली आहे. फक्त संघर्षासाठी पारंपारिक मच्छिमाराना वापरून घेऊन न्याय मात्र कधीही मिळवून दिलेला नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पारंपारिक मच्छिमारानी आता तरी विचार करावा आणि सावध व्हावे .असे आवाहन मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केले आहे.

कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, श्रमिक मच्छिमारांचे पदाधिकारी व पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी प्रथम टॉलर्स त्यांनतर अत्याधुनिक पर्ससीननेट , गिलनेट व आता एलईडी फिशिंग असा संघर्ष पारंपारिक मच्छिमारांसाठी तयार केला.

मात्र, नेतेगिरी मिरवणाऱ्या या नेत्यांनी पारंपारिक मच्छिमारांसोबत कोणतीही बैठक न घेता आगामी निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानाला पाठींबा देण्याचा परस्पर निर्णय जाहीर केला आहे. या हंगामातील मच्छिमारी ३१ मे रोजी संपणार असताना एक आठवड्यापूर्वी हा निर्णय घेऊन त्यांनी कोणाचा स्वार्थ साधला?

पारंपारिक मच्छिमारांनी मेळावा घेऊन अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मतदानाच्या दोन दिवस आधी तो निर्णय बदलणारे कोण होते? हे पारंपारिक मच्छिमारांनी शोधण्याची गरज आहे.

आचरा येथील आंदोलनात ९३ पारंपारिक मच्छिमारांवर गुन्हा दाखल करणारे व पारंपारिक मच्छिमार आता स्वाभिमान पक्षात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणार का? हा खरा प्रश्न आहे. आतापर्यंत पारंपारिक मच्छिमारांच्या संघर्षात ज्यांनी दरोडे किंवा खुनाचा प्रयत्न असा गुन्हा अंगावर घेतला त्या मच्छिमारांचे आता पुढे काय होणार? याचा विचार होणे आवश्यक आहे.

स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष पंधरा वर्षे पालकमंत्री होते तर आता भाजपचे खासदार आहेत. गेल्या दोन वर्षात किंवा त्यापूर्वी त्यांनी पारंपारिक मच्छिमारांच्या प्रश्नासाठी केंद्र शासनाजवळ काय प्रयत्न केले? त्याचबरोबर खासदार विनायक राऊत , केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू , अनंत गीते यांनी गेल्या ४ वर्षात काय उपाययोजना केल्या आहेत ? मग यापूर्वी काहीही करू न शकलेले हे नेते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तरी काय प्रयत्न करणार आहेत?

एलईडी बारा नॉटिकलच्या बाहेर मच्छिमारी करीत असल्याने हा विषय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतो. त्यावर शासनाला निर्णय घेण्यास लावण्याऐवजी खासदार विनायक राऊत केंद्रीय मंत्र्यांकडे एलईडी फिशिंग करणाऱ्यांना घेऊन गेले. ही शोकांतिका आहे.

पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्यांनी स्वाभिमानला पाठींबा देताना त्या पक्षाच्या किती सदस्यांच्या एलईडी पर्ससीननेट आहेत हे अभ्यासले नाही का ? त्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या पक्षात आधुनिकीकरणाच्या नावाखाली मच्छिमारी करणारे आहेत. त्याना पाठींबा देऊन पारंपारिक मच्छिमारांचे नेते कोणाला न्याय मिळवून देणार आहेत.

पालकमंत्री असताना नारायण राणे यांनी आधुनिकतेची कास धरणारे असे ज्यांच्याबद्दल सांगितले त्यांनीच पर्ससीननेट धारकांची संस्था निर्माण केली आहे . त्याच नेत्यांनी आता एलईडीमुळे पर्ससीननेट चालत नसल्याने व्यवसायातून मुक्त होवून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर आता पारंपारिक मच्छिमारांना उपदेश करून राजकारणातून आपले पुनर्वसन करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हे सर्व जनतेला माहीत आहे.

श्रमिक जीव रापण मच्छिमार संघटनेच्या अध्यक्षानी स्वाभिमान पक्षाला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाठींबा जाहीर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत काम करणारे आणि पारंपारिक मच्छिमारांचे नेते म्हणवून घेणाऱ्या श्रमिक जीव रापण मच्छिमार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नॅशनल फिश वर्कर्स फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत आपली भूमिका काय आहे? ते जाहीर करावे .असे ही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.


Web Title: Parasuram Upkar, the traditional fishermen's leader, is always misinterpreted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.