पंचतंत्र अन् इसापनिती
By Admin | Updated: November 20, 2014 00:23 IST2014-11-19T21:09:39+5:302014-11-20T00:23:49+5:30
बांधकाम कामगार : १ लाख मुलांना मिळणार पुस्तकांचा संच

पंचतंत्र अन् इसापनिती
प्रकाश वराडकर - रत्नागिरी -राज्यात इमारत व इतर बांधकाम कामगारांची १ लाख मुले आता स्पीकवेल मराठी, पंचतंत्र व इसापनिती शिकणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मुलाला ९ पुस्तकांचा प्रत्येकी हजार रुपये किमतीचा संच दिला जाणार असून, त्याचे वाटप रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे या महत्त्वाकांक्षी योजनेची पुस्तके नवनीत एज्युकेशन लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून घेण्यात आली असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
या मंडळातर्फे ३० जुलै २०१४ रोजीच्या बैठकीत इमारत बांधकाम कामगारांच्या पाल्यास प्रत्येकी हजार रुपयांचा शैक्षणिक उपयोगाच्या नऊ पुस्तकांचा संच भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या योजनेची कार्यवाही आता सुरू झाली आहे. या पुस्तक खरेदीवर कंपनीने १० टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे १११५ रुपयांचा हा नऊ पुस्तकांचा संच मंडळाला १००३ रुपये ५० पैसे किमतीला प्राप्त झाला आहे.
या योजनेंतर्गत कामगारांच्या एक लाख मुलांना जी ९ पुस्तके दिली जात आहेत, त्यामध्ये स्पीकवेल मराठी, जनरल नॉलेज मराठी, नवनीत अॅडव्हान्स डिक्शनरी, पंचतंत्र बूक (मराठी), पंचतंत्र बुक २ (मराठी), पंचतंत्र बुक ३ (मराठी), इसापनिती बुक १ (मराठी), इसापनिती बुक २ (मराठी), इसापनिती बुक ३ (मराठी) आदी विविध पुस्तकांचा समावेश आहे.
बांधकाम कामगारांची मुले वाचनापासून कायम पारखी असतात. त्यामुळे ही महत्वाकांक्षी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेचा एक लाख मुलांना लाभ देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
संचानंतर हवे मूल्यमापन
योजनेतील पुस्तकांचे संच जरी कामगारांच्या मुलांना देण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्या मुलांनी या पुस्तक संचाचा अभ्यास करून लाभ घेतला आहे काय, त्यांच्या ज्ञानात भर पडली आहे काय, याबाबतची तपासणी होणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. केवळ संच दिले व त्या पुस्तकांचा गठ्ठा तसाच ठेवला गेला तर या ज्ञानवृध्दिच्या योजनेचा उद्देशच सफल होणार नाही. त्यामुळे हे संच दिल्यानंतर त्याबाबत प्रबोधन करण्याची व त्या मुलांनी त्या पुस्तकांचे वाचन केले काय, त्यातून त्यांना काय लाभ झाला, याच्या मूल्यमापनाची गरज आहे.
दहा कोटींचा खर्च
रत्नागिरीतील ४२०० मुलांना योजनेचा लाभ
या योजनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांच्या ४२०० पेक्षा अधिक शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना हा शैक्षणिक पुस्तकांचा संच दिला जात आहे. तेवढे संच कामगार आयुक्त कार्यालयाकडे आल्याची माहिती कामगार उपायुक्त अनिल गुरव यांनी दिली. जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची संख्या अधिक असल्याने जिल्ह्यास याचा अधिक लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील कामगारांच्या मुलांसाठी दिलेल्या पुस्तकांसाठी ४२ लाख रुपये खर्च आला आहे.
वितरणावर मंडळाची नजर...
शासनाच्या योजनांमागील उद्देश नेहमीच चांगला असतो. परंतु त्या योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या झाली नाही तर योजना फसते. या योजनेचे तसे होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्याला किती पुस्तक संच मिळाले, त्याचे वितरण कसे झाले, याबाबतची तपशीलवार माहितीच मंडळाने मागितली आहे. त्यामुळे शिस्तबध्दतेने या संचांचे वितरण कामगारांच्या मुलांना करावे लागणार आहे.