भातशेती पाण्याखाली
By Admin | Updated: July 31, 2014 23:20 IST2014-07-31T22:17:53+5:302014-07-31T23:20:09+5:30
पावसाचा फटका : शेतकऱ्यांच्या पिकाची मोठी नुकसानी

भातशेती पाण्याखाली
चौके : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी, धामापूर, काळसे गावांना बसला असून या गावांतील सुमारे १५० एकर भातशेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे कर्ली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे त्या नदीकाठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, गुरुवारी पावसाचा काहीशा जोर ओसरला असला तरी भातशेतीतील पाणी तसेच होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
मालवण तालुक्यातील या तिन्ही गावांना जोडणारी कर्ली नदीचे पात्र छोटे असल्याने या नदीचे पाणी आजूबाजूच्या भात शेतीत घुसते. प्रत्येक वर्षी या भागातील शेतकऱ्यांना हा फटका सहन कराला लागतो. यासाठी शासनाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
या भातशेतीमध्ये घुसलेले पाणी वेळीच न ओसरल्यास भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांचे श्रम आणि पैसा वाया जाऊन त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गुरूवारी पहाटे धामापूर भगवती मंदिरानजिक रस्त्याशेजारी दरडीचा काही भाग कोसळला, परंतु त्यामुळे हानी झाली नाही. रस्त्यावर आलेले दगड स्थानिक ग्रामस्थांनी बाजूला केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही. परंतु, दिवसभर विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत होता. त्याचा त्रास ग्रामस्थांना दिवसभर सहन करावा लागला. (वार्ताहर)