सिंधुदुर्ग : कातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:03 PM2018-09-21T13:03:51+5:302018-09-21T13:09:09+5:30

गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

Paddy cultivation in paddy fields, rain pumpered with rain | सिंधुदुर्ग : कातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी

सिंधुदुर्ग : कातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी

googlenewsNext
ठळक मुद्देकातळ भागातील भातशेती करपली, पावसाने मारली दडी शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार

देवगड : गेले दहा ते बारा दिवस पावसाने दडी मारल्याने देवगड तालुक्यातील बहुतांश कातळ भागातील भातशेती करपून वाया गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना यावर्षी भातशेती नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

यावर्षी मृग नक्षत्रालाच पावसाने दमदार सुरुवात केली होती. जून व जुलै महिन्यांमध्ये भातशेती लावणीच्यावेळी मुसळधार पाऊस पडल्याने यावर्षी समाधानकारक उत्पादन मिळेल असे वाटत असतानाच अखेरच्या टप्प्यात पावसाने सप्टेंबर महिन्यात दडी मारल्याने तालुक्यातील कातळ भागातील भातशेती करपून गेली आहे.

जून व जुलै महिन्यांत मुसळधार तर आॅगस्ट महिन्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस यावर्षी झाला. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे.

गेली तीन-चार वर्षे तालुक्यामधील भातशेती पीक समाधानकारक मिळत होते. याचे कारण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस पडला होता. येथील भातशेती ही पूर्णत: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

शेतीसाठी यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खत विकत घेतले होते. तसेच बदलत्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिकतेकडे वळून भातशेती नांगरणीसाठी पॉवर टिलर कर्ज काढून खरेदी केले आहेत. विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांमधून कर्ज काढून घेतलेले खत व पॉवर टिलर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.

आंबा पीक समाधानकारक येण्याची अपेक्षा

देवगड तालुक्यात भातशेती करणारेच बहुतांश शेतकरी हे आंबा बागायतदार आहेत. भातशेती व आंबापीक धोक्यात आल्यास येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. आंबा तसेच मत्स्य व्यवसायावर येथील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच उदरनिर्वाहासाठी भातशेतीही केली जाते. यावर्षी भातशेतीचे नुकसान झाले तरी आंबा व मत्स्यपीक समाधानकारक व्हावे अशी आशा येथील शेतकºयांनी व्यक्त केली आहे.

नाचणी शेतीही धोक्यात

पुढील काही दिवसांत पाऊस पडला नाही तर मळेशेती व पानथळ जमिनीतील भातशेतीही पावसाअभावी वाया जाऊ शकते, असा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. देवगड तालुक्यात काही प्रमाणात नाचणी शेतीही केली जाते. नाचणी शेतीला आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत किमान तुरळक प्रमाणात पावसाची गरज असते. मात्र यावर्षी अचानक पावसाने दडी मारल्याने भातशेतीबरोबर नाचणी शेतीही वाया जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नुकसान भरपाईची मागणी

विशेष करून तालुक्यात पुरळ, गिर्ये, वाघोटण, मुटाट, मणचे, पेंढरी, बापर्डे, नाडण, फणसगाव, तिर्लोट व पडेल या गावांमध्ये नाचणी शेती जास्त प्रमाणात केली जात आहे. सुमारे पाच हजार हेक्टरवरती तालुक्यात भातशेती केली जात आहे. तर दीड ते दोन हजार हेक्टरवरती नाचणी शेती केली जाते.

पावसाअभावी भात व नाचणी शेतीचे नुकसान झाल्याने कृषी विभाग किंवा महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात यावेत, तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Web Title: Paddy cultivation in paddy fields, rain pumpered with rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.