तब्बल ३००० ‘सुकन्यां’च्या ‘समृद्धी’ची हमी
By Admin | Updated: March 22, 2015 00:33 IST2015-03-22T00:31:23+5:302015-03-22T00:33:26+5:30
टपाल खाते : रत्नागिरी जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद

तब्बल ३००० ‘सुकन्यां’च्या ‘समृद्धी’ची हमी
शोभना कांबळे / रत्नागिरी
शून्य ते १० वर्षांच्या आतील बालिकांच्या कल्याणासाठी भारतीय टपाल खात्याने २२ जानेवारीपासून सुरू केलेल्या ‘सुकन्या समृद्धी’ अल्पबचत योजनेला जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत सुमारे ३०५० खातेदारांनी आपल्या मुलीच्या नावे खाती उघडली आहेत.
बालिकांच्या कल्याणासाठी भारतीय टपाल विभागातर्फे २२ जानेवारीपासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ १ ते १० वर्षांच्या आतील बालिकांना मिळतो. योजनेची सुरूवात म्हणून एक वर्ष विशेष सवलत देण्यात आली असून, त्यानुसार यावर्षीच फक्त २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावे हे खाते उघडता येणार आहे. मात्र, सुरूवातीला १००० रूपये भरून खाते उघडता येईल. एका आर्थिक वर्षात कमीत कमी १००० रूपये किंवा जास्तीत जास्त १,५०,००० एवढी गुुंतवणूक करता येईल.
खाते उघडल्याच्या तारखेपासून चौदा वर्षे होईपर्यंत या खात्यात पैसे भरावे लागतील. आर्थिक वर्षात किमान १००० रूपये जमा न झाल्यास खाते अनियमित होईल. मात्र, असे झाले तरीही ५० रूपये भरून खाते पुनरूज्जीवित करता येईल. तसेच ही गुंतवणूक कर कपातीसाठीही पात्र धरण्यात येणार आहे. यासाठी नामनिर्देशनपत्राची आवश्यकता भासणार नाही. मात्र, या योजनेचा दोन लाभ केवळ मुलींसाठीच घेता येईल. या गुंतवणुकीवर ९.१ टक्के इतके व्याजही मिळणार आहे.
‘सुकन्या समृद्धी खाते’ या योजनेचा लाभ सामान्य पालकांना घेता येणे शक्य आहे. तसेच हे खाते एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरीत करणेही सहजशक्य आहे. मुलीला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्चत्तम शिक्षण आणि विवाह यासाठी ५० टक्के रक्कम काढता येण्याची सोय आहे. तसेच २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करता येईल. मुलींसाठी अतिशय उत्तम अशी ही योजना असल्याने जिल्हाभरातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत म्हणजे या दोन महिन्यातच सुमारे ३०५० इतके या योजनेचे खातेदार झाले आहेत. यापुढेही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक पालकांनी आपल्या नजीकच्या पोस्ट कार्यालयात संपर्क साधून या योजनेचा लाभा घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक बी. आर. सुतार यांनी केले आहे. (प्रतिनिधी)