अखर्चित निधीवरून सभेत खडाजंगी
By Admin | Updated: July 22, 2014 22:26 IST2014-07-22T22:25:03+5:302014-07-22T22:26:48+5:30
निधी जाणार मागे : सदस्य-अधिकारी भिडले

अखर्चित निधीवरून सभेत खडाजंगी
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७६ लाख रूपये आरोग्य उपकेंद्र बांधकामाचा निधी अखर्चित राहिल्यावरून सदस्य व अधिकारी यांच्यात मंगळवारच्या वित्त समिती सभेत खडाजंगी झाली. हा अखर्चित निधी कसा राहिला याबाबत सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले असता अधिकाऱ्यांनी याबाबतची जबाबदारी सदस्यांवरच उलटवली.
आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध होत नाही. जागेबाबत लोकप्रतिनिधींशी संपर्क साधूनही ते कोणतेही सहकार्य करीत नाहीत. याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे आजची सभा विशेष लक्षणीय ठरली. सन २०१२-१३चा अखर्चित ३ कोटी ६२ लाख एवढा निधी शासनाला परत करावा लागणार आहे.
जिल्हा परिषद वित्त समितीची सभा सभापती भगवान फाटक यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी समिती सदस्य सुरेश ढवण, सुभाष नार्वेकर, समिती सचिव तथा वित्त अधिकारी मारूती कांबळे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीलाच वित्त व बांधकाम सभापती यांचे स्विय सहाय्यक विकास पाटकर यांचे निधन झाल्यामुळे सभागृहाने श्रद्धांजली वाहिली.
अखर्चित राहिलेला ३ कोटी ६२ लाखांचा निधी शासनास परत करावा लागला आहे. यात ७६ लाख निधी आरोग्य उपकेंद्र बांधकामावरील आहे. यावरून सदस्य सुरेश ढवळ यांनी जोरदार हंगामा केला. अखर्चित निधी राहिलाच कसा? जर तो बांधकामांवर खर्च होत नव्हता तर तो दुरूस्ती आदी इतर कामांवर वळता करून खर्च करायला हवा होता. मात्र तुम्ही कोणत्याही हालचाली करीत नाही, असा आरोप आरोग्य विभागावर केला असता बांधकामावरील निधी इतर कोणत्याही कामासाठी खर्च करता येत नाही आणि आरोग्य केंद्र बांधकामासाठी आवश्यक असलेल्या जागा जिल्हा परिषदेच्या नावे होऊ न शकल्याने हा निधी खर्च कणे शक्य नव्हते आणि इतर कामांसाठी निधी असल्याने त्या कामांसाठीही त्या निधीची आवश्यकता नव्हती. मात्र या अधिकाऱ्यांच्या उत्तराने सदस्य ढवळ हे अधिकच संतप्त झाले. आजच्या या सभेत अधिकारी आणि सदस्य यामधील वादंगामुळे ही सभा विशेष लक्षवेधी ठरली. (प्रतिनिधी)
जान्हवी सावंत यांचा निषेध
जिल्हा परिषद सदस्या जान्हवी सावंत यांनी जिल्हा परिषद विकास निधीमध्ये अपव्यय झाला असल्याबाबतची तक्रार पंचायत राज समितीकडे केली. याबाबत नाराजी व्यक्त करत सदस्य सुरेश ढवळ यांनी या सभेत निषेध केला. जिल्हा परिषद विकास निधी हा एकमेव निधी हा सर्व जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये समान खर्च होतो. त्यामध्ये कोणताही अपव्यय झालेला नाही. असे असतानाही अशा खोडसाळ तक्रारी करणे योग्य नाही. अशा विघ्नसंतोषी सदस्यांना कुणीही अधिकाऱ्यांनी घाबरून जाऊ नये, अशा प्रकरणात आम्ही सदैव अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू, असा टोलाही ढवळ यांनी लगावला.
कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अपूर्ण
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरूस्तीची कामे अपूर्ण आहेत. कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र दुरूस्तीचे काम कसाल ग्रामपंचायतीने २०११ मध्ये घेतले आहे. ते आजपर्यंत ते काम पूर्ण झाले नाही. अशा बऱ्याच ग्रामपंचायतींनी प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे पूर्ण केली नाही, अशी माहिती आजच्या सभेत दिली असता अशा ग्रामपंचायतींना काळ््या यादीत टाका आणि पुन्हा या ग्रामपंचायतींना कोणतीही कामे देऊ नका, अशी सूचना सदस्य सुरेश ढवळ यांनी मांडली असता सभापती फाटक यांनी तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
४ सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील अखर्चित निधी २०१३-१४ या वर्षात खर्च करण्यास प्रशासनास मुदत असते. मात्र, मार्च २०१४ अखेर तब्बल ३ कोटी ६२ लाख एवढा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनास जमा झाला आहे. यात आरोग्य विभाग- १ कोटी ७५ लाख, ग्रामपंचायत विभाग- ४९ लाख, महिला बालकल्याण विभाग- ४२ हजार, समाजकल्याण विभाग- १ लाख १४ हजार, बांधकाम विभाग- ५३ लाख, लघुपाटबंधारे विभाग- २४ लाख ६६ हजार, पाणीपुरवठा विभाग- ५७ हजार, पशु विभाग- १७ हजार, शिक्षण विभाग- ५ हजार असा एकूण ३ कोटी ६१ लाख ६४ हजार रूपये शासनाकडे जमा झाले आहेत.