संघटीत महिला शक्तीचे दर्शन

By Admin | Updated: August 21, 2014 00:25 IST2014-08-20T21:13:39+5:302014-08-21T00:25:18+5:30

मिळून साऱ्याजणी महिला मंचचा कार्यक्रम

Organized women's philosophy of power | संघटीत महिला शक्तीचे दर्शन

संघटीत महिला शक्तीचे दर्शन

कणकवली : ‘रिमझिम सरी ग रिमझिम सरी, तुझ्यापेक्षा माझी फुगडी बरी’ अशा विविध गीतांच्या साथीने कणकवली परिसरातील महिलांनी फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला. निमित्त होते ते येथील मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मन भावन श्रावण’ कार्यक्रमाचे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटीत महिला शक्तीच्या आविष्काराचे दर्शनच जणू उपस्थितांना घडले.
येथील दुर्गाराम मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात फुगड्यांबरोबरच महिलांनी घेतलेली वैविध्यपूर्ण उखाणी उपस्थितांची दाद मिळवून गेली. श्रावण महिन्यामध्ये विविध सण साजरे करण्यात येतात. तसेच गणेशोत्सवाचे वेधही या काळात लागलेले असतात. या सणांच्या निमित्ताने फुगड्या खेळण्याचा आनंद महिला लुटत असतात. फुगड्यांच्या निमित्ताने आपल्या मनातील भावना इतर सख्यांकडे व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळत असते. मात्र, अलिकडे फुगडी-झिम्मासारखे पारंपरिक खेळ कमी झाले आहेत. त्यांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी, तसेच आपल्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ महिलांना देता यावा यासाठी दरवर्षी मिळून साऱ्याजणी महिला मंचच्यावतीने श्रावण महिन्यात फुगड्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
दिंडा, कोंबडा, बसफुगडी, पिंगा, एका हाताची फुगडी, ढोपर फुगडी, माकड फुगडी, गौळण फुगडी, होडी, सुसर, मासा अशाप्रकारे १५ पेक्षा जास्त विविध प्रकारच्या फुगड्या घालत महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
फुगड्यांमधून शरीराची लय, तोल आणि व्यायामाचा मेळ घातला जातो. फुगड्या खेळणे म्हणजे प्रेमाने गरगर फिरणे. यामधून मनाची आनंददायी स्थिती स्त्रियांना अनुभवता येते. फुगड्यांमधून विविध गाणी गात, खेळ खेळले जातात. यातूनच विवाहित महिलांचा संवादी मेळ रंगत जातो. त्यात अनेक मुलीही सामील होतात. या सर्व गोष्टींचे दर्शन मिळून साऱ्याजणी महिला मंचने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून पुन्हा एकदा झाले. या कार्यक्रमाच्यावेळी जिजाऊ महिला महाबचतगटाच्या अध्यक्षा नीलम राणे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, माजी नगरसेविका समृद्धी पारकर, मधुरा पालव, तेजल लिंग्रज यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. (वार्ताहर)

Web Title: Organized women's philosophy of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.