‘योजना बंद’च्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: February 26, 2015 00:15 IST2015-02-25T21:49:58+5:302015-02-26T00:15:39+5:30
हसोळमधील प्रकरण : गटविकास अधिकाऱ्यांची भेट--लोकमतचा दणका

‘योजना बंद’च्या चौकशीचे आदेश
राजापूर : तालुक्यातील हसोळ - लाडवाडी नळपाणी पुरवठा योजना आठ दिवस बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द करताच राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी बुधवारी हसोळ ग्रामपंचायतीला भेट दिली असून, त्वरित खुलासा करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत. या वृत्ताची दखल घेत संबंधित ग्रामपंचायतीने आजपासूनच पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरु केला आहे. शंभर टक्के पाणीपट्टी वसुली न झाल्याने तालुक्यातील हसोळ ग्रामपंचायतीने गेले आठ दिवस नळपाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकमतने बुधवारच्या अंकात प्रसिध्द केले होते. ग्रामपंचायतीने आठ दिवस पाणी न दिल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता. बुधवारी राजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी हसोळ ग्रामपंचायतीला भेट दिली व याबाबतची कारणे जाणून घेतली. काही ग्रामस्थ गेली पाच - सहा वर्षे पाणी पट्टीच भरत नव्हते. त्यामुळे लाईटबिल भरणे अवघड झाले होते. त्यानुसार तेथील सर्व ग्रामस्थांशी चर्चा करूनच ग्रामपंचायतीतर्फे हा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही योजना सार्वत्रिक असल्यामुळे कुणाचीही वैयक्तीक जोडणी बंद करता येत नव्हती. त्यामुळे सर्वानुमतेच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली आहे. मात्र, त्यांचा हा खुलासा आपण तत्काळ लेखी स्वरुपात मागवला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आजपासून पुन्हा सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरु करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक प्रदीप सावंत यानी लोकमतशी बोलताना दिली. (प्रतिनिधी)