..तर ठेकेदारावर कारवाई करा
By Admin | Updated: July 16, 2014 23:17 IST2014-07-16T23:08:28+5:302014-07-16T23:17:00+5:30
नगरसेवकांची मागणी : कणकवली नगरपंचायत सभा

..तर ठेकेदारावर कारवाई करा
कणकवली : कणकवली शहरातील कचरा उचलण्याबरोबरच साफसफाई करण्यामध्ये एक दिवसाचा जरी खंड पडला तरी संबंधित ठेकेदारावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी केली. आरोग्याशी निगडीत सेवेबाबत कोणताही ढिसाळपणा केला जाऊ नये, असेही यावेळी सुचविण्यात आले.
येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी संतोष वारूळे उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने शहरातील साफसफाईबाबतचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला. साफसफाई करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचे दोन महिन्याचे देयक का देण्यात आलेले नाही? असा प्रश्न नगरसेविका मेघा गांगण यांनी उपस्थित केला. निधी उपलब्ध नसल्याने संबंधित ठेकेदाराबरोबरच पाणीपुरवठा तसेच आरोग्य विभागाचीही देयके प्रलंबित असल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शहरातील आठवडा बाजार मंगळवारी असतो. त्यामुळे भाजी विक्रेत्यांसह अन्य विक्रेत्यांकडून टाकलेला कचरा बाजारपेठेत पडलेला असतो. हा कचरा तत्काळ साफ करणे आवश्यक आहे.
मात्र, कंत्राटी कामगारांचे वेतन देण्यात न आल्याने हा कचरा साफ करण्यात आला नसल्याचे सभागृहात सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराला ठेका देताना अटी व शर्थी घालण्यात आलेल्या असतात. त्यानुसार साफसफाईचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने एक दिवसाचाही सेवेत खंड पडल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी केली. जनतेला चांगल्या सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, ठेकेदारावर कारवाई केल्यानंतर सेवा ठप्प झाली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर सभेत जोरदार चर्चा करण्यात आली.
अंगणवाडीमध्ये पोषण आहार शिजविण्यासाठी महिला मंडळांना परवानगी देणे, नगरपंचायत कार्यालयात बायोमॅट्रीक मशिन बसविणे, तेलीआळी येथील उषा कन्स्ट्रक्शनजवळील गटारांचा प्रश्न अशा विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आला. तसेच विविध निविदांना मंजुरी देण्यात आली. १४व्या वित्त आयोगाअंतर्गत कामे सुचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील एलईडी दिवे कधी बसविणार? असा प्रश्न नगरसेविका नंदिनी धुमाळे यांनी उपस्थित केला. याबाबतचे सर्व साहित्य उपलब्ध झाले असून ठेकेदार लवकरच कामाला सुरूवात करेल, असे नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)