पर्यटकांना रॅपलिंग अन् गुंफा सफरीची संधी
By Admin | Updated: April 30, 2015 00:30 IST2015-04-29T22:16:04+5:302015-04-30T00:30:08+5:30
प्रशासनाने धाडसी पर्यटकांसाठी साहसी खेळही आयोजित केले आहेत.

पर्यटकांना रॅपलिंग अन् गुंफा सफरीची संधी
रत्नागिरी : जिल्ह्यामध्ये दि.२ ते ४ मे या कालावधीत रत्नागिरी पर्यटन महोत्सव साजरा होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत पर्यटकांना रॅपलिंग आणि गुंफा सफरीची संधी मिळणार आहे.जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासनाने धाडसी पर्यटकांसाठी साहसी खेळही आयोजित केले
आहेत.पर्यटन महोत्सवात साहसी क्रीडा प्रकाराअंतर्गत रत्नागिरीतील रत्नदुर्ग माऊंटेनिअर्स या संस्थेच्या सहकार्यातून साहसी क्रीडा प्रकार आयोजित करण्यात आले आहेत. दि. २ आणि ३ मे २०१५ रोजी भाट्ये समुद्रकिनारा येथील झरी विनायक मंदिराजवळ सकाळी ९.३० ते १२.३० वाजेदरम्यान रॅपलिंग या क्रीडा प्रकाराचे आयोजन करण्यात येणार आहे.
तसेच ४ मे २०१५ सकाळी १० ते ६ या वेळेत गुंफा सफर कँप उपक्रमात भगवती मंदिर रत्नदुर्ग गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या २७५ फुट भुयाराची अंतर्गत रचना पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी नर्मदा सिमेंट जेटी जवळील किल्ल्याच्या पायथ्याशी जमायचे आहे.
यावेळी सर्व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्व सुरक्षा साधनांचा वापर करण्यात येणार आहे, उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)