‘...तरच एस. टी. फायद्यात येईल’
By Admin | Updated: January 8, 2015 00:00 IST2015-01-07T22:08:07+5:302015-01-08T00:00:42+5:30
सुनील ताकवले : विजयदुर्ग येथे सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन

‘...तरच एस. टी. फायद्यात येईल’
पुरळ : एसटी महामंडळाच्या कर्मचारी वर्गाच्या दक्षतेमुळे आजवर एसटी महामंडळ हे प्रवाशांचे हक्काचे स्थान झाले आहे. मात्र, आपण नोकरी करीत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याने एसटी हे केवळ आपले उत्पन्नाचे साधन आहे, एवढ्यापुरते मर्यादित न राहता स्वत:चे घर समजून काम केले तर भविष्यात एसटी महामंडळ निश्चित फायद्यात येईल, असा विश्वास बँक आॅफ इंडियाचे सहायक शाखाधिकारी सुनील ताकवले यांनी विजयदुर्ग येथे स्पष्ट केले.
या आगारातर्फे सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. हा सप्ताह १० जानेवारीपर्यंत होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ताकवले उपस्थित होते. त्यांनी सुरक्षा आणि स्वच्छता यासंदर्भात उहापोह केला. दरम्यान, कार्यक्रमाचे अध्यक्ष आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी २०१४ सालातील अपघाताबाबतची आकडेवारी विषद केली. जिल्ह्यातील आगारामध्ये झालेल्या ६० अपघातांपैकी केवळ एकच अपघात विजयदुर्ग आगाराच्या गाडीला झाल्याचे सांगितले. एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेबाबत कटाक्षाने काळजी घेत आहे. आगारातील मार्ग बिघाड होण्याचे प्रमाणही कमी होते, असे ते म्हणाले.
यावेळी सहायक वाहतूक निरीक्षक एस. एस. डोंगरे, विठ्ठलवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष संजय सावंत उपस्थित होते. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एस. बी. नाईक व के. एस. खाडये यांचा, चालक आर. के. ठाकरे यांचाही सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डी. पी. पवार यांनी केले. (वार्ताहर)