सावंतवाडीत गोमांस विक्रीच्या संशयावरून एकजण ताब्यात

By Admin | Updated: July 12, 2015 00:37 IST2015-07-12T00:37:32+5:302015-07-12T00:37:32+5:30

नागरीक संतप्त : सहा तास पोलीस ठाण्यात ठिय्या

One person in possession of beef for sale in Sawantwadi | सावंतवाडीत गोमांस विक्रीच्या संशयावरून एकजण ताब्यात

सावंतवाडीत गोमांस विक्रीच्या संशयावरून एकजण ताब्यात

सावंतवाडी : सावंतवाडीत दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. या अपघातावेळी नझीर अहमद महमद जमादार (वय ५६, रा. बाहेरचावाडा, सावंतवाडी) याच्याकडे गोमांस असल्याचा संशय स्थानिक नागरिकांना आला. यामुळे खळबळ उडून नागरिकांनी संबंधिताच्या अटकेसाठी तब्बल सहा तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई सुरू केली होती.
शनिवारी सकाळी नऊ वाजता नीतेश गणेश रेडकर (रा. कवठणी, सावंतवाडी) याच्या ताब्यातील करिझ्मा दुचाकी आणि नझीर अहमद महमद जमादार चालवीत असलेल्या टीव्हीएस दुचाकीत कंटक पाणंद येथे अपघात झाला. त्यात जमादार रस्त्यावर दुचाकीसह कोसळला. त्यावेळी त्याच्याकडे असलेल्या पिशवीत मांस असल्याचे दिसून आले.
नागरिकांनी तातडीने याबाबत पोलिसांना कळविले. पोलीस कॉन्स्टेबल पी. आर. माने घटनास्थळी आले; पण त्यांनी काहीच घडले नसल्याचा आव आणला. त्यामुळे संतप्त नागरिकांनीच ते मांस पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांची भेट घेऊन याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. सुरुवातीला पोलिसांनी त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नागरिकांच्या दबावानंतर पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी वनविभागाचे अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी ई. बुकतारे यांना बोलावून मांसाची प्राथमिक तपासणी करून घेतली.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमदर्शनी आपला अहवाल पोलिसांना दिला. पोलीस तसेच खासगी पंचासमोर हे मांस पिशवीत बंद करण्यात आले असून, ते आज, रविवारी पुणे येथे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांनी नझीर अहमद महमद जमादार याच्यावर महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९९५ चे सुधारित कलम ५(६) प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत जमादार याच्यावर अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.
जमादार याच्याकडे गोमांसच असून, मांस विक्रीची कोणतीही परवानगी नाही. हॉटेल तसेच अन्य कोणतेही उद्योग नाहीत, अशी तक्रार सुनील पेडणेकर यांनी दिल्यानंतर अवैधरीत्या गोमांस विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला, तर अपघाताची तक्रार नीतेश रेडकर याने दिली.
पोलिसांच्या पवित्र्याने सर्वपक्षीयांचा ठिय्या
हा प्रकार बाहेर येताच पोलिसांनी ते गोमांस नाहीच, असा पवित्रा घेतल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. अखेर नझीर जमादार याच्यावर गुन्हा दाखल करीत त्याला ताब्यात घेण्याचे आश्वासन देताच आंदोलनकर्ते शांत झाले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, चंद्रकांत कासार, माजगाव सरपंच आबा सावंत, महेश पांचाळ, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, शिवसेना शहरप्रमुख शब्बीर मणियार, संदीप सुकी, गौरांग रेगे, सतीश नार्वेकर, चेतन आजगावकर, सत्यवान बांदेकर, दिलीप भालेकर, आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते जमा झाले होते.
मीच मटन दिले : शारबिद्रे
आंदोलनकर्ते आक्रमक झाले असतानाच सावंतवाडीतील मटन व्यापारी विवेक शारबिद्रे पोलीस ठाण्यात आला आणि त्याने मीच जमादार याला मटन दिले, असे सांगितले. माझ्याकडून चार किलो मटन नेले, असे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना त्याने सांगताच पोलिसांनी त्याच्याकडून रीतसर जबाब नोंदवून घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उलट-सुलट सवाल केले; पण शारबिद्रे आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. (प्रतिनिधी)
 

Web Title: One person in possession of beef for sale in Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.