ओसरगाव अपघातात एक ठार
By Admin | Updated: February 15, 2015 00:37 IST2015-02-15T00:37:55+5:302015-02-15T00:37:55+5:30
दहा जखमी-एक गंभीर : झायलो-डंपरची समोरासमोर धडक

ओसरगाव अपघातात एक ठार
कणकवली : महामार्गावर ओसरगांव कानसळीवाडी येथे शनिवारी दुपारी झायलो-डंपर अपघातात एक जागीच ठार झाला. तर चार प्रवासी जखमी झाले. जखमींना ओरोस येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती कपिल दशरथ पाटील (३५, रा.नालासोपारा, पालघर) यांनी दिली.
याबाबत वृत्त असे की, कपिल पाटील आपल्या कुटुंबीय व नातेवाईकांसह वसई येथून गोव्याला झायलो (एम.एच.४८-पी-४८१३) आणि अन्य एका वाहनातून फिरायला जात होते. दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास ओसरगांव येथे महिला भवननजीक समोरून येणाऱ्या डंपरला (एम.एच.-०७-सी ६४३६) झायलो गाडीची धडक बसली. यात कार चालक हितेश दिनकर पाटील (वय २८, रा. आगाशी, विरार पूर्व, जिल्हा पालघर) हा जागीच ठार झाला. तर मनोज यशवंत ठाकूर (सफाळे, नगावे, पालघर), यशवंत रामचंद्र ठाकूर, निर्मला यशवंत ठाकूर, अर्पणा मनोज ठाकूर, हर्षदा शशिकांत पाटील, कुणाल शशिकांत पाटील, वृषाली दिलीप घरत, तृप्ती मनोज ठाकूर, मानसी मनोज ठाकूर (सर्व रा. पालघर) हे जखमी झाले. यातील मानसी ठाकूर या गंभीर जखमी असल्याने त्यांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. चालक हितेश पाटील हा अपघात झाल्यानंतर गाडीतच अडकून पडला होता. स्थानिकांनी त्याला गाडीच्या बाहेर काढले. अपघातात खडी भरून नेणारा डंपरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला. डंपरचालक संजय रामचंद्र जाधव (४०, रा.घोणसरी, कणकवली) हा जखमी झाला. कारमधील जखमींना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. डंपरचालकास उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. उपनिरीक्षक संतोष वालावलकर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)