वृद्ध कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: September 24, 2015 00:05 IST2015-09-23T22:24:19+5:302015-09-24T00:05:06+5:30
शिवराम कांदळकरांची व्यथा : ४० वर्षे कला जोपासणाऱ्याकडे शासन लक्ष देईल का ?

वृद्ध कलाकार मानधनाच्या प्रतीक्षेत
मालवण : कोकणासह सिंधुदुर्गात गणेशोत्सवाकडे महाउत्सव म्हणून पाहिले जाते. घरोघरी आकर्षक व मोठ-मोठ्या गणपती मूर्ती असतात. शेकडो वर्षांची येथे प्रथाच आहे. अगदी गावागावात गणेश मूर्ती बनविणारे कलाकारही शेकडोच्या संख्येने आहेत. पिढीजात गणेश मूर्ती बनविण्याची कला जोपासणारे यातील अनेक कलाकार आजही शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेपासून वंचित आहेत. ४० वर्षाहून अधिक काळ मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील गणेश मूर्ती कला जोपासणारे शिवराम (काका) शंकर कांदळकर हे त्यापैकीच एक. वयाची ८३ वर्षे पूर्ण झाली तरीही आजही काका कांदळकर गणेश मूर्ती साकारत आहेत. शासनाच्या कांदळकर यांना वृद्ध कलाकार मानधन योजना सुरु करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
परिसरातील अनेक कुटुंबीयांच्या निवासस्थानी काका कांदळकर यांनी साकारलेल्या आकर्षक व सुबक मूर्तीचे पूजन होते. अगदी हडी, सर्जेकोट, कांदळगाव, कोळंब, वायरी या मालवण तालुक्यातील गावात व शहराच्या ठिकाणी यांनी साकारलेल्या गणेश मूर्ती मागविल्या जातात. ४० हून अधिक काळ गणेश मूर्ती बनविण्याबरोबर शेती हा त्यांचा व्यवसाय आहे. गेली काही वर्षे त्यांचा मुलगा युवराज मूर्ती साकारण्यात हातभार लावतो.
मात्र, काका कांदळकर या कलाकाराकडे शासनाचे अद्यापही लक्ष गेलेले नाही. आता वृद्धापकाळाने शेती व चित्रशाळा चालविणे अवघड होत आहे. मूर्तीकला व्यवसायातही महागाईचा विचार करता अनेक अडचणी, समस्या आहेत. मात्र, त्या सर्वावर मात करून गणेश भक्तांना आकर्षक मूर्ती बनवून देताना काका कांदळकर यांच्याकडून ही कला आजही जोपासली जात आहे. तरी शासनाने या कलाकाराकडे लक्ष देऊन वृद्ध कलाकार मानधन योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी कुटुंबीय व गणेशभक्तांसोबत ग्रामस्थांतून होत आहे. (प्रतिनिधी)