सावंतवाडी : सावंतवाडीतील सरकारमान्य धान्य गोडावूनमध्ये गोडावून कीपर मनाला वाटेल तेव्हा धान्य उतरवून घेत असल्याने बाहेरून धान्य घेऊन येणारे ट्रक चालक वैतागले आहेत. त्यातच गोडावूनमधील कर्मचाऱ्यांची उद्धट उत्तरे या ट्रकचालकांना सहन करावी लागत आहेत. दिवस-रात्र भर रस्त्यात ट्रक उभे करून ठेवण्याच्या प्रकारामुळे ट्रकचे पार्ट तसेच ट्रकमधील धान्य चोरीस जाण्याचे प्रकार वाढले आहेत.या प्रकारांबाबत ट्रकचालक संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांचे लक्ष वेधले आहे. याबाबत माहिती अशी की, सावंतवाडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी धान्य गोडावून आहे. या गोडावूनमध्ये धान्य घेऊन येणारे तसेच धान्याची वाहतूक करणारे अनेक नेहमी ये-जा करीत असतात. हे धान्य गोडावून रस्त्यालगत असल्याने येणारे आणि जाणारे ट्रक रस्त्यावरच उभे केले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याच रस्त्यावर शाळा व महाविद्यालयाची वाहतूक तसेच विश्रामगृहाच्या परिसरात असणारा आरटीओ कॅम्प व त्या गाड्याही याच रस्त्यावर लावण्यात येतात.अनेकवेळा या रस्त्यावर धान्य घेऊन येणारे ट्रक लावले जातात. ते ट्रक दोन दोन दिवस खाली केले जात नाहीत. याबाबत ट्रकचालकांनी तसेच मालकांनी ट्रक खाली करण्याबाबत गोडावूनच्या अधिकाऱ्यांना सांगितले. तर त्यांची उध्दट उत्तरे या ट्रकचालकांना मिळत आहेत. तसेच या ट्रकच्या अनेक किमती वस्तू चोरीला गेल्या आहेत. कारण रात्रभर ट्रक जर रस्त्यावर उभा करून ठेवला तर त्याकडे लक्ष देण्यास शासनाचा गार्ड नाही की या ट्रकना वेगळी सुरक्षितता नाही.ट्रकमधील एक धान्याचे पोते जरी चोरीला गेले तरी त्यांची जबाबदारी ही ट्रकचालक किंवा मालकावर ढकलली जाते. अशामुळे व्यथीत झालेल्या ट्रकचालक व मालकांनी नायब तहसीलदार शशिकांत जाधव यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची दखल घेत लेखी तक्रार द्या, आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना माहीती देतो, असे सांगितले आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची मनमानी
By admin | Updated: July 14, 2014 23:36 IST