भूमिपुत्रांना आर्थिक पाठबळ मिळवून देऊ
By Admin | Updated: December 29, 2014 00:06 IST2014-12-28T21:37:38+5:302014-12-29T00:06:52+5:30
सु. ग. शेवडे : मालवण-वायरी येथील मोरयाचा धोंडा क्षेत्राची पाहणी

भूमिपुत्रांना आर्थिक पाठबळ मिळवून देऊ
मालवण : किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीचा प्रारंभ मोरयाचा धोंडा या पवित्रस्थानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते झाला होता. या क्षेत्राला फार मोठे महत्त्व आहे. ते पावित्र्य व महत्त्व टिकवण्यासाठी या क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी धडपडत असलेल्या येथील भूमिपुत्रांना आवश्यक ते आर्थिक व प्रशासकीय पाठबळ मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन इतिहासाचे गाढे अभ्यासक व व्याख्यानकार भारताचार्य सु. ग. शेवडे यांनी दिले.
यावेळी भारताचार्य शेवडे यांनी मोरयाचा धोंडा क्षेत्राच्या विकासासाठी मेहनत घेणाऱ्या येथील स्थानिक दत्तात्रय नेरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. होणारी पूजा ही धोंड्याची पूजा नसून मूर्तीची पूजा आहे. या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त असून मोरयाचा धोंडा असे संबोधण्यापेक्षा धोंड्यावरचा मोरया असे संबोधणे जास्त उचित ठरेल, असे सांगत या स्थानाच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य लाभेल, असे आश्वासन शेवडे यांनी दिले. यावेळी प्रवीर पारकर म्हणाले, महाराज ग्रुप ही कंपनी पर्यटनाभिमुख काम करीत आहे. मोरयाचा धोंडासारख्या अजूनही दुर्लक्षित क्षेत्राचा पर्यटनात्मकदृष्ट्या विकास झाल्यास पर्यटकांचा ओघ वाढेल. या क्षेत्राच्या विकासाबाबत स्थानिक भूमिपुत्रांची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेला न्याय देण्याचे प्रयत्न करू, असेही पारकर म्हणाले. तसेच यावेळी उपस्थित असलेले भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनीही या क्षेत्राच्या विकासासाठी भाजप प्रयत्नशील असून यासाठी आावश्यक प्रशासकीय पाठबळ भाजपच्या माध्यमातून दिले जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
मालवण-वायरी येथील मोरयाचा धोंडा या प्रसिद्ध क्षेत्राला भारताचार्य सु. ग. शेवडे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, दत्तात्रय नेरकर, श्री महाराज ग्रुप आॅफ कंपनीजचे प्रवीर पारकर आदी उपस्थित होते.
यावेळी भारताचार्य शेवडे यांनी उपस्थितांसमवेत ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष करीत शिवरायांना मानवंदना दिली.