कोकणात आता लक्ष प्रचारसभांकडे
By Admin | Updated: October 6, 2014 22:37 IST2014-10-06T21:30:57+5:302014-10-06T22:37:20+5:30
स्टार प्रचारक शेवटच्या टप्प्यात रिंगणात उतरविणार असल्याने रणधुमाळीत कमालीची रंगत चढणार

कोकणात आता लक्ष प्रचारसभांकडे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सध्या दुसरा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात उमेदवार, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मतदारांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्या त्या गावातील पुढारी, गावकरी मंडळी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याची आश्वासने दिली जात आहेत. आता मतदानाला सात दिवसांचा कालावधी उरल्याने प्रचाराचा शेवटचा आणि निर्णायक टप्पा सुरू होणार असून, या टप्प्यात नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या सभांमध्ये खडाजंगी रंगणार असून, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेनेकडून दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसात कोकणात प्रचारसभा घेऊन कार्यकर्ते आणि उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात रत्नागिरी आणि कणकवली येथे प्रचारसभा घेणार आहेत. राष्ट्रवादीकडून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सावंतवाडीत सभा घेणार असल्याचे राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसकडून प्रचारप्रमुख नारायण राणे यांच्या जाहीर सभा होतील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील कोकणात दौरा करणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या कोट्यातील स्टार प्रचारक शेवटच्या टप्प्यात रिंगणात उतरविणार असल्याने रणधुमाळीत कमालीची रंगत चढणार आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील.
लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात ज्या ज्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा झाल्या त्या त्या भागात भाजपाने मोठी मुसंडी मारली. समोरील उमेदवारांचा मोठा पराभवही झाला. परंतु त्या निवडणुकीत मोदी लाट होती. कोकणात मोदींची सभा झाली नव्हती. तरीदेखील येथे शिवसेनेला मोठे मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्यावेळच्या परिस्थितीत महायुती म्हणून शिवसेना, भाजप, आर. पी. आय. एकत्र होते आणि राष्ट्रवादीच्या नाराज गटानेही कोकणात काँग्रेसविरोधी काम केले होते. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. आता प्रत्येक पक्ष स्वतंत्ररित्या निवडणूक रिंगणात आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या सभेमुळे कोणता इफेक्ट होतो. भाजपाची कोकणातील ताकद वाढणार काय ? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय विश्लेषकांसमोर असताना याच बाबतीत येथील जनतादेखील उत्सुक आहे. त्यामुळे आता कोकणातील सर्व जनतेचे लक्ष नरेंद्र मोदींच्या सभेकडे लागले आहे.
नरेंद्र मोदी पहिल्यांदाच कोकणात जाहीर सभा घेणार असल्याने ते कोणत्या लोकल विषयावर बोलतात की, इतर ठिकाणी होणाऱ्या सभांप्रमाणे राष्ट्रीय मुद्दे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीवर टीका करतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची सभा ही कोकणातील मतदारांसाठी एक वेगळे आकर्षण राहणार आहे. ऐन प्रचाराच्या समारोपाला कोकणात रत्नागिरी आणि कणकवलीत जर मोदींची सभा झाली तर भाजपाची लाट कोकणात येईल की काय? असा प्रश्न सध्या सर्वांसमोरच आहे. परंतु कोकणातील जनतेला मोदी पहिल्यांदाच संबोधीत करणार असल्याने त्याबाबतची वेगळी ‘क्रेझ’ निर्माण झाली आहे.
पडद्यामागे
महेश सरनाईक