सिंधुदुर्गात आता लागणार प्रत्येकाची कसोटी
By Admin | Updated: September 29, 2014 00:02 IST2014-09-29T00:02:12+5:302014-09-29T00:02:24+5:30
खरी ताकद कळणार; चौरंगी लढतीमुळे विजयाबाबतची गणिते बनली अवघड

सिंधुदुर्गात आता लागणार प्रत्येकाची कसोटी
महेश सरनाईक ल्ल कणकवली
विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील लढाई बहुरंगी आणि बहुढंगी होणार आहे. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच चौरंगी लढती होणार असल्याने विजयाबाबतची गणिते मांडणे अवघड बनले आहे. परंतु पहिल्यांदाच या निवडणुकीत कोण किती पाण्यात आहे, ते स्पष्ट होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता आतापर्यंत विधानसभांच्या निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष, नंतर जनता पक्ष, जनता दल, काँग्रेस, शिवसेना अशा सर्वच पक्षांसोबत येथील जनता त्या त्या स्थितीतील वातावरणाप्रमाणे राहिली आहे. परंतु या प्रत्येकवेळच्या निवडणुकीत प्रमुख दोन पक्षांमध्येच लढत झाली आहे. आता ही पहिलीच निवडणूक असेल की, यावेळी प्रमुख चार पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक उमेदवाराची कसोटी लागणार आहे.
आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये नारायण राणे विरोधात जिल्ह्यातील सर्व पक्ष अशी लढाई असायची. मात्र, ही अशी पहिलीच वेळ आहे की, सर्व पक्ष वेगवेगळे लढत आहेत आणि प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे आता केवळ राणे यांना विरोध करायचा म्हणून दुसऱ्याला मदत करायची, हे जुने सूत्रदेखील चालणार नाही. कारण या निवडणुकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्या पक्षाची किती ताकद आहे. कोण पक्षाशी निष्ठावंत आहे. कोणी किती प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले, या सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाला मानणारे काही कार्यकर्ते आणि मतदार आहेत ते त्या त्या पद्धतीने प्रत्येकाच्या मागे राहणार आहेत. त्यामुळे केवळ व्यक्तीविरोधाचा मुद्दा या निवडणुकीत गौण ठरणार आहे.
त्यामुळे यापूर्वी नारायण राणेंच्या पर्यायाने काँग्रेसच्या विरोधात अंतर्गत युती करून लढणारे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप हे पक्ष आता स्वतंत्ररित्याच एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने नारायण राणेंसाठी पर्यायाने काँग्रेससाठी ही निवडणूक इतर पक्षांच्या तुलनेने सोपी ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईकर चाकरमान्यांचा मोठा फायदा झाला. कारण येथील बहुसंख्य कुटुंबातील एकतरी व्यक्ती व्यवसाय, उद्योगानिमित्त मुंबईत वास्तव्यास आहे. शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील नगरसेवक, शिवसेना विभागप्रमुख, शाखाप्रमुख, वॉर्डप्रमुख अशा सर्वच बाबतीत मूळचे कोकणातील रहिवासी असलेल्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेच्या प्रचारकार्यात मोठी भूमिका निभावली होती. कारण रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १६ एप्रिलला झाली होती, तर मुंबईमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २४ एप्रिलला झाली होती. त्यामुळे कोकणातील निवडणुकीत मुंबईकर चाकरमान्यांनी मदत केली.
यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाचवेळी १५ आॅक्टोबरला मतदान होणार आहे आणि सर्व पक्ष वेगवेगळे लढत असल्याने प्रत्येकाला आपला मतदारसंघ किंवा आपला भाग सोडून दुसरीकडे प्रचारासाठी जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे यावेळी कोणाची मदत अथवा सहानुभूतीदेखील मिळण्याची शक्यता नाही.
गत सर्व निवडणुकापेक्षा ही निवडणूक वेगळी असल्याने आता याबाबत तर्कवितर्क बांधणेदेखील सोपे नाही. त्यामुळे प्रत्यक्षात कोण जिंकणार, कोण हरणार याबाबत अंदाज बांधण्यापेक्षा प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करा, असे आदेश सर्वच नेत्यांकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.