शिक्षकांसाठी आता ‘कॅशलेस’ आरोग्य
By Admin | Updated: September 11, 2014 00:10 IST2014-09-10T22:49:15+5:302014-09-11T00:10:07+5:30
पोलिसांच्या धर्तीवर योजना : शिक्षण हक्क कृती समितीची मागणी

शिक्षकांसाठी आता ‘कॅशलेस’ आरोग्य
शिवापूर : राज्यातील शिक्षकांसाठी पोलिसांच्या धर्तीवर कॅशलेस आरोग्य योजना सुरू करणार असल्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शिक्षक भारती आणि शिक्षण हक्क कृती समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आजारी पडल्यानंतर होणाऱ्या औषधोपचाराचा खर्च परताव्याच्या रुपाने मिळतो. परंतु त्यासाठी प्रचंड त्रास शिक्षकांना सहन करावा लागतो. वर्षानुवर्षे बिले मिळत नाहीत. मंत्रालयापर्यंत चकरा माराव्या लागतात. खर्चिक शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारावरील खर्चासाठी आयत्यावेळी उसनवार करावी लागते.
ही सगळी दगदग टाळण्यासाठी पोलिसांच्या धर्तीवर ‘सावित्री फातिमा कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य योजना’ सुरू करावी, अशी मागणी शिक्षक भारतीने केली होती. आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्यवाह सुभाष मोरे यांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांच्या या योजनेचे प्रारूप सादर केले होते. शिक्षणमंत्र्यांनी याबाबत शिक्षण सचिवांना अहवाल सादर करण्यास सांगितले होते.
राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना राज्य सरकारतर्फे कॅशलेस कुटुंब आरोग्य सुविधा पुरविली जाते. मुंबई आणि राज्यातीलच नव्हे, तर देशातील रुग्णालयांमध्ये विनाकॅश महागडे उपचार करून घेणे त्यामुळे पोलिसांना शक्य झाले आहे. त्याच धर्तीवर शिक्षक भारतीने प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे सादर केला आहे. या योजनेमुळे शासनाच्या खर्चातही बचत होणार आहे. शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना चांगल्या रुग्णालयात उपचार करून घेणे शक्य होणार आहे.
या योजनेनुसार एक स्मार्ट कार्ड देण्यात येणार असून, ते स्वाईप केल्यावर कोणत्याही नेटवर्क रुग्णालयात रुग्णाला २७ प्रकारचे आजार आणि पाच गंभीर (कॅन्सर, एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट) आजारांसाठी कॅशलेस उपचार मिळतील. या योजनेला सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहशिक्षिका फातिमा शेख यांचे नाव देण्याची सूचना शिक्षक भारतीने केली आहे. सात लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ होऊ शकेल. सिंधुदुर्ग शिक्षक भारतीच्यावतीनेही शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांच्याकडे या योजनेबाबत मागणी केली होती. शिक्षकांसाठी ‘कॅशलेस आरोग्य योजना’ सुरू करण्याचे आश्वासन दिल्याने शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्यवाह सुभाष मोरे यांचे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, उपाध्यक्ष दीपक तारी, सचिव सुरेश चौकेकर, संघटक कमलेश गोसावी यांनी अभिनंदन केले आहे. (वार्ताहर)