हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा
By Admin | Updated: December 2, 2014 21:27 IST2014-12-02T21:12:59+5:302014-12-02T21:27:00+5:30
कासार्डे ग्रामपंचायतीची कारवाई : सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी दिली एक दिवसाची मुदत

हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा
नांदगांव : वारंवार सूचना देऊनही कासार्डे पेट्रोलपंप परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी सांडपाण्याच्या निर्गतीची व्यवस्था केली नसल्याने सोमवारी कासार्डे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागामार्फत तीन हॉटेल व्यावसायिकांना सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिल्याची माहिती कासार्डे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर यांनी दिली.
कासार्डे पेट्रोलपंप परिसरात अनेक हॉटेल व्यावसायिक आहेत. अनेक मोठी वाहने याठिकाणी नियमित थांबतात. मात्र, हॉटेलच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नसून उघड्यावरच पाणी सोडले जात असल्याने आरोग्य विभागामार्फत यापूर्वी दोनदा नोटीसा देण्यात आल्या होत्या. तसेच कासार्डे ग्रामपंचायतीनेही स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनेच्या दृष्टीने २४ तासांची नोटीस देण्यात आली. मात्र, काही हॉटेल व्यावसायिकांकडून त्याबाबत गंभीर दखल घेतली गेली नाही. याबाबतचा विषय कासार्डे ग्रामपंचायतीच्या २६ नोव्हेंबरच्या ग्रामसभेत चर्चेला आला. त्यावेळी ठरल्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहणी करावी व आवश्यक कारवाई करावी असे ठरविण्यात आले.
ग्रामसभेतील ठरावानुसार सोमवारी सर्व हॉटेलांची पाहणी करण्यात आली. यावेळी तीन हॉटेलांचे सांडपाणी बाहेर सोडल्याचे निदर्शनास आले.
या हॉटेल व्यावसायिकांना एक दिवसाची मुदत देण्यात आली असून या कालावधीत सांडपाण्याची व्यवस्था संबंधित हॉटेल व्यावसायिकांनी करायची आहे.
या पाहणीवेळी सरपंच संतोष पारकर, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय शेट्ये, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, बाळाराम तानवडे, आरोग्य सहाय्यक ठाकर, आरोग्यसेवक मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य विजय कोलते, ग्रामविकास अधिकारी प्रविण कुडतरकर, ग्रामपंचायत कर्मचारी विद्याधर नकाशे, गणेश पाताडे, राजा सावंत, भाऊ शेट्ये व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
पुन्हा तीन हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा
कासार्डे पेट्रोलपंपाजवळील हॉटेल शिवसाई, हॉटेल कमल व हॉटेल दत्तकृपा या तीन हॉटेलांना एक दिवसाची नोटीस ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. सोमवारी केलेल्या पाहणीत या तिन्ही हॉटेलांचे सांडपाणी बाहेर सोडलेले निदर्शनास आले. तसेच त्यांनी याबाबत नियोजन न केल्यास परवाने रद्द करण्याबाबत कारवाई करण्यात येईल असे नोटीसीमध्ये म्हटले आहे.