मोरगाव आरोग्य केंद्राच्या चार कर्मचाऱ्यांना नोटीस
By Admin | Updated: September 11, 2015 00:43 IST2015-09-11T00:42:10+5:302015-09-11T00:43:30+5:30
साथरोग प्रकरण : मुख्यालयात अनुपस्थित राहिल्याबद्दल कारवाई

मोरगाव आरोग्य केंद्राच्या चार कर्मचाऱ्यांना नोटीस
ओरोस : जिल्ह्यात तापसरी, डेंग्यू, स्वाइन फ्लू या रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, आरोग्य सभापतींनी जे आरोग्य कर्मचारी निवासस्थानी राहत नाहीत त्यांच्या निवासस्थानी रात्रीच्या भेटी सुरूकेल्या असून, सावंतवाडी तालुक्यातील मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आरोग्य सभापतींच्या अचानक भेटी पथकाने कर्मचारी धास्तावले आहेत.
गुरुवारी बॅ. नाथ पै समिती सभागृहात आरोग्य समिती सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य, प्रमोद कामत, जान्हवी सावंत, रेश्मा जोशी, नम्रता हरदास, भारती चव्हाण, कल्पिता मुंज यांच्यासह अधिकारी, सचिव योगेश साळे व संबंधित खातेप्रमुख उपस्थित होते.
गेले काही महिने जिल्ह्यात तापसरी साथीबरोबर डेंग्यू, स्वाइन फ्लूची साथ सुरू आहे. जिल्ह्यात साथ आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
मागील आठवड्यात सावंतवाडी, निरवडे व तळकट या ठिकाणी भेटी देण्यात आल्या. दरम्यान, एकाच रात्रीच्या पहिल्या भेटीवेळी उपस्थित असलेले कर्मचारी क्रॉस चेकिंगसाठी पुन्हा दोन तासांनी केलेल्या भेटीदरम्यान जागेवर उपस्थित नसल्याचे आढळून आल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.
त्यामुळे संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या. तसेच किमान तापसरीची साथ आटोक्यात येईपर्यंत तरी आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. अन्य कोणतीही गय केली जाणार नाही. संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये येथे आरोग्य उपकेंद्रासाठी चार वर्षांपूर्वी बक्षीसपत्राने दिलेली जागा जिल्हा परिषदेने वापरली नसल्याने ती देण्याची मागणी कामत यांनी केली. दरम्यान, निधी मंजूर नसल्याने या इमारत बांधकाम झाले नाही. कुर्ली प्राथमिक शाळा आवारात उपकेंद्र इमारत बांधण्यास ग्रामस्थांचा विरोध आहे. ग्रामस्थांनी दुसरी जागा देण्याचे कबूलही केले. बांधकाम इमारतीचे याबाबत पत्रही दिले; मात्र जिल्हा परिषदेने दखल न घेता निम्म्याहून जास्त बांधकाम जबरदस्तीने केले गेले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच याच जागेत हे उपकेंद्र झाल्यास मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे, असेही सभेत स्पष्ट करण्यात आले. तळकट व हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री केसरकर व आमदार नाईक यांनी प्रत्येकी सहा लाख रु. मंजूर केलेत. त्यामुळे चालक, इंधन व देखभाल दुरुस्ती मंजूर करून देण्याची मागणी प्राधान्याने समितीकडे केली.