संतप्त पालकांची सेंट्रल इंग्लिश स्कूलला नोटीस
By Admin | Updated: October 9, 2014 23:06 IST2014-10-09T21:43:27+5:302014-10-09T23:06:45+5:30
सावंतवाडीतील घटना : न्यायालयाचा आदेश धुडकावला

संतप्त पालकांची सेंट्रल इंग्लिश स्कूलला नोटीस
सावंतवाडी : सेंट्रल इंग्लिश स्कूलमधील मोहम्मद सनान वसीम शेख या मुलाला शाळेत फी भरून दाखल करून घेत नसल्याने सनान शेखच्या पालकांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, जिल्हा न्यायालयाने फी भरून घेण्याचा आदेश देऊनही या आदेशाची शाळेचे मुख्याध्यापक अंमलबजावणी करीत नसल्याने सनानच्या पालकांनी जिल्हा न्यायालयाने शाळेला दिलेली नोटीस गुरुवारी शाळेच्या सूचना फलकावर लावली.
यासोबतच दहावीमध्ये शिकत असणाऱ्या रिशमा महम्मद आमीन खलील व महम्मद रफीक नाईक यांचीही फी व इतर शुल्क भरून घेण्याची नोटीस जिल्हा न्यायालयाने दिली होती.
या नोटीसचीही शाळेने अंमलबजावणी न केल्याने यासोबत तीन नोटीस शाळेच्या सूचना फलकावर या विद्यार्थ्यांचे पालक फारूख अल्ली नाईक व खलील अब्दुल सलाल खान यांनी लावली आहे. सनान शेखच्या पालकांनी फी वाढीविरोधात व शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात अनेक वेळा उपोषणे करून आंदोलनही छेडले होते. मात्र, मुलाला प्रवेश नाकारल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात फी भरवून घेण्याबाबत व सनान शेख याला शाळेत प्रवेश देण्याबाबत याचिका दाखल केली होती. यामुळे जिल्हा न्यायालयाने ही सुनावणी करून शाळेला नोटीस दिली होती. सनान शेख या मुलाची फी भरून घेणे व त्याला शाळेत प्रवेश द्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, या नोटीसीची अंमलबजावणी शाळेने न केल्याने गुरुवारी सनान शेखच्या पालकांनी शाळेच्या सूचना फलकावर ही नोटीस लावली.
शाळेच्या मुुख्याध्यापकांना याबाबतीत विचारणा केली असता, न्यायालयाच्या आदेशाची प्रत संस्थेच्या संचालकांकडे पाठविण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशावर कोणती कारवाई करावयाची ते संस्थाचालकच ठरवतील, अशी माहिती दिली. (वार्ताहर)
मुलांचे शैक्षणिक नुकसान
सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या वाढीव फी विरोधात आवाज उठविल्याने वसीम शेख यांच्या मुलाला महिनाभरापूर्वी शाळेतून बाहेर काढले होते. यानंतर पालकांनी सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ठिय्या मांडला. तसेच संचालक व शाळेच्या शिक्षकांना धारेवर धरले होते. शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात पालकांनी आवाज उठवित असताना वसीम शेख यांचा मुलगा सनम शेख यांना शाळेतून बाहेर काढले होते व फी भरून घेण्यासही नकार दिला होता. यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले.