पोषण आहार नाही; तर विद्यार्थ्यांना उत्तरकार्याची जेवणावळ
By Admin | Updated: January 7, 2015 23:59 IST2015-01-07T22:11:32+5:302015-01-07T23:59:38+5:30
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाठराखण?

पोषण आहार नाही; तर विद्यार्थ्यांना उत्तरकार्याची जेवणावळ
खेड : शालेय पोषण आहाराबाबत विविध तक्रारी सुरु असतानाच खेडमध्ये एक विचित्रच प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यातील मुरडे ब्राह्मणवाडी येथील केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांना ५ जानेवारी रोजी पोषण आहार न देता चक्क उत्तरकार्याचे जेवण जेवायला दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खेड तालुक्यात पोषण आहाराबाबत वाढत्या तक्रारी असताना आता मुरडे येथे नवीनच प्रकार उघडकीस आला आहे. मुरडे येथे दररोज पोषण आहार दिला जातो. मात्र, दि. ५ जानेवारी रोजी शालेय पोषण आहार शिजवण्यात आला नाही. हा आहार शिजवणाऱ्या महिलेला आज आहार शिजवायचा नाही, असे सांगून तिला आहार शिजवू दिला नाही. ५ जानेवारीस शाळेलगतच असलेल्या शामसुंदर दळवी यांच्या आईच्या उत्तरकार्याची ती जेवणावळ होती. विशेष म्हणजे या पोषण आहार समितीचे अध्यक्ष सरपंच दिगंबर दळवी आहेत. त्यांना या जेवणावळीची कोणतीही माहिती या शिक्षकांनी दिली नव्हती़ या जेवणावळीचे निमंत्रण मुलांना दिल्याने पोषण आहार शिजवला नसल्याची माहिती येथील पदवीधारक शिक्षक जगताप गुरूजी यांनी आपल्याला फोनवरून दिल्याचे सरपंच दिगंबर दळवी यांनी सांगितले. मुळातच ही बाब अतिशय गंभीर आहे. केंद्रप्रमुख दराणे आणि मुख्याध्यापक मोहिते यांनी मुलांना अशा प्रकारचे जेवण दिल्याने ते सरकारच्या कोणत्या नियमांमध्ये बसते? असा सवाल उपस्थित केला आहे.
सरकारने दिलेला शालेय पोषण आहार शाळेत उपलब्ध असताना एखाद्या उत्तरकार्याचे जेवण विद्यार्थ्यांना देणे हे कितपत योग्य आहे, तसेच शासनाच्या पोषण आहारासाठी असलेल्या धोरणाचे पूर्ण उल्लंघन केले आहे़
विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांच्या काही तक्रारींबाबत आपल्याकडे माहिती आली असतानाच आता हे शिक्षकांचे नवीन प्रकरण उजेडात आल्याने सरपंच दिगंबर दळवी यांनी चिंता व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाठराखण?
सोमवारी गटशिक्षणाधिकारी मंगला वाव्हळ यांच्या समवेत झालेल्या बैठकीतदेखील वाव्हळ यांनी कारवाईचे आश्वासन न देता या दोन्ही शिक्षकांना पाठीशी घालत असल्याचा दळवी यांनी आरोप केला आहे़. खेड तालुक्यात शालेय पोषण आहार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी येत असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने दळवी यांनी सांगितले.
केंद्रप्रमुख आणि शिक्षकांनी गावातीलच एका उत्तरकार्याची जेवणावळ घडवल्याने संताप व्यक्त होत आहे. सरपंच दिगंबर दळवी यांनी तर या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़ तसे निवेदन दळवी यांनी गटशिक्षणाधिकारी मंगल वाव्हळ यांना दिले आहे. याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी वाव्हळ यांनी थेट कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.