शत्रू नव्हे मित्रच! --नागपंचमी विशेष
By Admin | Updated: July 31, 2014 23:22 IST2014-07-31T22:46:17+5:302014-07-31T23:22:10+5:30
महाराष्ट्रात आढळणारे प्रमुख विषारी साप

शत्रू नव्हे मित्रच! --नागपंचमी विशेष
कणकवली : आपल्याकडे दिसला साप की मार, असे प्रकार नेहमीच घडतात. प्रत्यक्षात साप धोकादायक आणि विषारी असले तरी त्यांच्यामुळे शेतातील उंदरांचा बंदोबस्त होऊन धान्याची नासाडी होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे साप हा पर्यावरणाचा तोल सांभाळणारा प्राणी आहे, हे लक्षात येते; मात्र केवळ काही गैरसमजुतीतून हा सरपटणारा प्राणी संपविण्याचा सपाटा मानव जातीने लावला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही कमी होत चालली आहे. आज (शुक्रवार) नागपंचमी... या उत्सवाच्या निमित्ताने सापांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे.
महाराष्ट्रात आढळणारे प्रमुख विषारी साप
मण्यार
इंग्रजी नाव : उङ्मेङ्मल्ल ्रल्ल्िरंल्ल ‘१ं्र३
रंग : निळसर काळा, त्यावर पांढरे आडवे पट्टे. शेपटीकडून डोक्याकडे येतात.
लांबी : सुमारे तीन ते साडेतीन फूट.
भक्ष्य : या सापाचे मुख्य भक्ष्य साप आहे. त्याचबरोबर उंदिर, पालीदेखील आहे.
आढळतात : पडक्या इमारतीत दगड, विटांचे ढीग, शेत, उंदरांची बिळे आदी ठिकाणी.
प्रदेश : सगळीकडे.
वैशिष्ट्ये : मण्यार हा नागापेक्षा चारपट विषारी; मात्र शांत स्वभावाचा आहे. शरीराच्या मध्यभागी षटकोनी खवल्याची रांग डोक्यापासून शेपटीपर्यंत आहे.
गैरसमज : मण्यारची सावली पडल्यास शरीराला खाज सुटते.
झोकापंचमी
महाराष्ट्र राज्याच्या एकूण ३,०७,७१३ चौ.कि. भागापैकी (भौगोलिक क्षेत्रफळापैकी) ६१,९३९ चौ.कि. भाग जंगलांनी व्यापला आहे. त्यात हजारो प्रकारच्या वनस्पती, ८५ प्रकारचे सस्तन प्राणी, ५०० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी व २७८ प्रकारचे साप आढळतात. अशी समृद्ध जैवविविधता महाराष्ट्रात आहे.
या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी राज्यात ४१ संरक्षित जंगले आहेत. ताडोबा, मेळघाट आणि पेंच हे ३ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय उद्याने व ३५ अभयारण्य आहेत. अशा या महान देशात नागाला देवता मानून कृतज्ञतेच्या भावनेने पूजण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी. (हळद व रक्तचंदनाने) नागाची प्रतिमा पाटीवर वा भिंतीवर काढून दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवून नागाची पूजा केली जाते, म्हणून या दिवसाला ‘नागपंचमी’ असे म्हणतात. या सणाला ग्रामीण भागात नागोबाची पूजा झाल्यावर मंदिराजवळच्या झाडाला झोके बांधून मनसोक्तपणे खेळले जातात. म्हणून या सणाला ‘झोकापंचमी’ असेही म्हणतात. बायका, झोके, फुगड्या, झिम्मा खेळून आनंद साजरा करतात. शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर खेळणे व वारुळापर्यंत जाणे ह्यातून शरीराला घडणारा व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. कारण ग्रीष्म ऋतूत क्षीण झालेली शक्ती व भूक दोन्ही वाढवण्यासाठी शरीराला व्यायाम आवश्यक असतो. तो नागपूजनाच्या निमित्ताने या काळात घडून येतो. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून निघून खऱ्या खुऱ्या जंगलात जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्याचा आनंद यानिमित्ताने मिळतो. श्रावण महिन्यात सणांची सुरुवात होते ती नागपंचमीने. श्रावण महिना म्हणजे सृष्टीचा बहरण्याचा काळ. हिरवा शालू पांघरूण नटलेली ही ‘वसुंधरा’ मनाला भुरळ घालते. या काळात निसर्गातील अनेक घटकांशी आपण जोडले जातो. मानव व निसर्ग यामधले सामोपचाराचे नाते जपण्याचा एक सुंदर प्रयत्न या कालावधीत होतो.
‘मनुष्य ज्या गोष्टीला समजू शकला नाही, त्याला तो घाबरतो आणि ज्या गोष्टीला तो घाबरतो, त्या गोष्टीला तो नष्ट करू लागतो.’ मनुष्याच्या ह्याच वृत्तीचे साप हे बळी ठरले. कारण मनुष्य सापाविषयीचे गुढ, सत्यता व नम्रता कधीच समजू शकला नाही, म्हणूनच त्याची हत्या करत आला. वास्तविक, देव-देवतांच्या पूजनांसोबत वनस्पती पूजन व प्राणीपूजनसारख्या सणांना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. या सृष्टीची जैवविविधता जोपासण्याचं महान काम मानव संस्कृतीने केले असून, भारतीय संस्कृती ही जैवविविधतेच्याच भक्कम पायावरच आधारलेली आहे. आपल्या सण व उत्सवांद्वारे या विविधतेची ओळख होते. त्यामुळेच देव-देवतांत सापाला महत्त्वाचे स्थान प्रदान केले आहे.