दोडामार्ग हत्याकांडातील एकाचाही तपास नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 21:59 IST2015-07-10T21:59:55+5:302015-07-10T21:59:55+5:30
पोलिसांवर नाराजी : पीडितांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेत; पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी

दोडामार्ग हत्याकांडातील एकाचाही तपास नाही
वैभव साळकर - दोडामार्ग -झरेबांबर येथील रोशनी गवस तिहेरी हत्याकांड असो, अथवा मणेरीतील सुजाता तळवडेकर या तरुणीचे घातपात प्रकरण असो तालुक्यातील संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास लागलेला नाही. पोलीस यंत्रणेच्या या अपयशामुळे खुनी मोकाटच फिरत आहेत. ठरावीक कालावधीने फाईल बंद होते. मात्र, पीडितांचे नातेवाईक न्यायाच्या प्रतीक्षेतच आहेत. जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडून तालुकावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. पोलीस यंत्रणेवरील उडत चाललेला विश्वास परत मिळविण्यासाठी तालुक्यातील घातपात व संशयास्पद प्रकरणांचा तपास पुन्हा नव्याने सुरू करण्याची मागणी तालुकावासीयांमधून होत आहे.
दुर्गम आणि डोंगराळ भाग म्हणून दोडामार्गची ओळख आहे. गेल्या काही वर्षात येथील गुन्हेगारीची संख्या वाढली आहे. सन २००२ साली झरेबांबर येथे घडलेल्या रोशनी गवस तिहेरी हत्याकांडाने तर संपूर्ण तालुका हादरून गेला होता. रोशनी व तिचा मुलगा विशाल व मुलगी प्रियांका यांचा धारदार कोयत्याने निर्घृण खून करण्यात आला होता. याबाबत पोलिसांकडून योग्य पद्धतीने तपास होत नसल्याचा आरोप अनेकवेळा झाला. मृत रोशनी गवसचा पती रघुनाथ गवस याने अनेकवेळा याबाबत आवाज उठविला, उपोषणे केले, तरी देखील या प्रकरणाचा तपास लागलाच नाही. या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अमृत गवस हा रोशनी गवस हिचा दीर होता. तर त्याला तेथीलच मनोज गवस याची साथ होती. ज्यादिवशी हे हत्याकांड उघडकीस आले त्या दिवसापासून मनोज गवस फरारी आहे. तो अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही. तर अमृत गवस याचा दीड वर्षांपूर्वी मुत्यू झाला. मात्र, हत्याकांडामधील गूढ मात्र कायम राहिले.
मणेरी येथील सुजाता तळवडेकर या तरुणीचे घातपात प्रकरणही पोलीस यंत्रणेच्या अकार्यक्षम तपासामुळे उलघडू शकले नाहीत. कळणे येथे खासगी काजू कारखान्यामधून काम आटोपून घरी परतत असताना घरापासून हाकेच्या अंतरावरच ती गुढरीत्या गायब झाली होती. सुजाता घरी न परतल्याने सायंकाळी नातेवाइकांनी शोधाशोध केली असता तिच्या पायातील चपला, जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली घराकडे जाणाऱ्या पायवाटेवर संशयास्पदरीत्या सापडले होते. पुढे दोन दिवसांनी तिचा मृतदेह तिलारीच्या नदीपात्रात घटनास्थळापासून खाली बऱ्याच अंतरावर सापडला होता. यावेळी दोडामार्ग तालुक्याचा कारभार तत्कालीन पोलीस निरीक्षक नंदकुमार देशमुख यांच्याकडे
होता.
प्रथमदर्शनी त्यावेळी विद्युतलाईन ओढण्याचे काम करणाऱ्या बंगाली कामगारांना संशयित म्हणून अटक केली होती. या प्रकरणात देशमुख यांच्यावर संशयास्पदरीत्या तपास होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला होता. अखेर लोकांच्या मागणीनुसार हे प्रकरण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले. त्यावेळी हा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रभाकर भागवत यांच्याकडे होता. भागवत हे आरोपीच्या अगदी जवळ पोहोचले होते; परंतु ठोस पुरावा हाती न लागल्याने आरोपीला अटक करणे शक्य झाले नाही, अशी चर्चा खुद्द पोलीस यंत्रणेतच सुरू होती. या प्रकरणातील आरोपी हा स्थानिक असल्याचे देखील त्यावेळी बोलले जात होते. कालांतराने सुरुवातीला आरोपी म्हणून न्यायालयात हजर केलेले बंगाली कामगार निर्दोष म्हणून सुटले आणि खुनी मात्र मोकाटच राहिला.
तालुक्यात अशी अनेक प्रकरणे घडली. ज्यांचा तपास शेवटपर्यंत लागलाच नाही. नेत्रा डायना यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, आयनोडे-झरेबांबर येथील रूपाली नाईक हिचा संशयास्पद मृत्यू, घोडगेवाडी येथील पूजा नाईक प्रकरण, आदींचा तपास लागलेला नाही. कालांतराने या प्रकरणाच्या फाईली बंद करण्यात आल्या. त्यामुळे आरोपी गजाआड होऊ शकले नाहीत.
नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा भार दत्तात्रय शिंदे यांनी स्वीकारला आहे. त्यांच्याकडून तालुकावासीयांना अनेक अपेक्षा आहेत. आतापर्यंत तालुक्यात घडलेल्या या अशा संशयास्पद प्रकरणांचा तपास ते नव्याने करतील आणि आरोपींना गजाआड करून मृतांच्या नातेवाइकांना न्याय मिळवून देतील, अशी अपेक्षा तालुकावासीयांना आहे. त्यांनी सुरू केलेली अवैध धंद्यावरील कारवाई तालुक्यासह जिल्ह्यात कौतुकास्पद ठरत आहे. दोडामार्गातील या गूढ ठरलेल्या हत्याकांड प्रकरणाकडे त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले, तर मोकाट फिरणारे खुनी तुरुंगात जाण्यास वेळ लागणार नाही.
पोलीस यंत्रणा अपयशीच
तालुक्यात आतापर्यंत अनेक वेळा संशयास्पद मृतदेह आढळले. जे अनोळखी होते; परंतु ते कोठून आले. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण काय, याबाबतचा तपास लागलेला नाही. संशयास्पदरीत्या झालेल्या आत्महत्यांमागचे गुपितही उलघडण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. त्यामुळे तालुकावासीयांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वासच उडू लागलेला आहे.