यापुढे साखरेची उचल करणार नाही
By Admin | Updated: February 24, 2015 00:02 IST2015-02-23T22:00:26+5:302015-02-24T00:02:03+5:30
वेंगुर्लेत सभा : धान्य दुकानदार संघटना आक्रमक

यापुढे साखरेची उचल करणार नाही
वेंगुर्ले : गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने चक्क २० रुपयांचा तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा काढल्याने यापुढे साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय धान्य दुकानदार संघटनेच्या सभेत घेण्यात आला. वेंगुर्ले तालुका धान्य दुकान संघटनेची सभा सिध्दिविनायक कार्यालय, वेंगुर्ले येथे संघटनेचे अध्यक्ष तात्या हाडये यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी पार पडली. या सभेस अशोक राणे, रवींद्र पेडणेकर, दादा गावडे, आपा गावडे, श्रीकांत खोत, शेखर पालयेकर, वेतोरे धान्य दुकानदार बबन कांबळी आदी उपस्थित होते. कमी दरात साखर विक्री करण्याच्या निर्णयावर व एपीएल कार्डधारकांच्या धान्यासंदर्भात यात चर्चा करण्यात आली. गेली कित्येक वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर रेशन दुकानदार पिवळ्या कार्डधारकांना लेव्ही साखर विक्री करीत आहेत. पण आता शासनाने कहर केला. चक्क २० रुपये तोटा सहन करा व साखर विक्री करा, असा फतवा निघाला. या संदर्भात संघटनेची सभा होऊन सर्व धान्य दुकानदारांनी साखर उचल न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.
सर्व तालुक्यातील संघटना रिबेट व मार्जिन वाढ व्हावी, याकरिता आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. पण शासन दाद देत नाही. भरमसाट वाढलेली वाहतुकीची भाडी (डिझेल कमी होऊनही भाडे कमी होत नाही), मनमानी हमाली या सर्व गोतावळ्यात धान्य दुकानदार डबघाईस आले आहेत. त्यात दर महिन्या-दोन महिन्यांनी नोकर असल्यासारखे वेगवेगळी कामे करायला शासन भाग पाडत आहे. त्याचा कोणताही मोबदला दिला जात नाही. मग अमूक काम अमूक दिवसात पूर्ण करा. हे फॉर्म भरा, ती रजिस्टरे तयार करा, ग्राहकांचे बँक खातेक्रमांक करा, आधारकार्ड नंबर भरा, हे सर्व आम्ही का करावे, त्यासाठी शासन पगार देते का? ही हाताशी यंत्रणा आहे, म्हणून जबरदस्तीने तिला शासन राबवतेय? जे काम तलाठ्यांनी करावयाचे ते आमच्या गळ्यात का मारले जाते? असा आरोप यावेळी करण्यात आला.
वास्तविक या सर्व धान्य वितरणाच्या बाबतीत चेअरमन लोकांनी उचल घेतली पाहिजे होती. कारण धान्य दुकानातील तोटा म्हणजे ज्या रकमेतून धान्य खरेदी करतो, त्या तोट्यामुळे धान्य खरेदीचे भांडवल कमी होते, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा संस्थेची दुकाने व संस्थेचे कर्मचारी यांना जिवंत ठेवण्यासाठी सर्व चेअरमननी आपले कर्मचारी व त्यांचे कुटुंब इतर शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे कसे जगतील, याचे प्रयत्न करावेत, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. (वार्ताहर)
शासन अन्याय करत असल्याचा आरोप
आज ना उद्या शासन न्याय देईल, या आशेवर आम्ही शासनाची बरीच कामे करीत आलोय. पण न्याय नाहीच, उलट शासन आमच्यावर अन्यायच करीत आहे. यात आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना दोष देणार नाही. शासनाचे आदेश येतील, त्याप्रमाणे ते आम्हाला सांगतात. यात शासनच दोषी आहे, अशा भावना धान्य दुकानदारांनी व्यक्त केल्या.