गद्दारांची हयगय न करता साफसफाई मोहीम नीतेश राणे यांचे सूतोवाच :

By Admin | Updated: November 22, 2014 00:11 IST2014-11-21T22:45:18+5:302014-11-22T00:11:48+5:30

कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने सत्कार

Nitesh Rane's cleanliness campaign without hindrance to traitors: | गद्दारांची हयगय न करता साफसफाई मोहीम नीतेश राणे यांचे सूतोवाच :

गद्दारांची हयगय न करता साफसफाई मोहीम नीतेश राणे यांचे सूतोवाच :

कणकवली : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. या गद्दारांची यादी मी तयार केली आहे. या गद्दारांची पक्षात हयगय न करता लवकरच साफसफाई केली जाणार आहे, असा इशारा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी दिला. तसेच काँग्रेसची सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असलेली पकड मजबूत करण्यासाठी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शतप्रतिशथ काँग्रेसचे वर्चस्व राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन राणे यांनी केले. येथील मातोश्री मंगल कार्यालयात काँग्रेसच्यावतीने आमदार नीतेश राणे यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुदन बांदिवडेकर, सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबा वर्देकर, शरद कर्ले, महेश गुरव, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, प्रामाणिक व निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची पॉवर असते. विधानसभेच्या निवडणुकीत मला निवडून आणण्यासाठी कणकवली तालुक्यातील कार्यकर्त्यांनी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळेच मी या मतदारसंघातून निवडून आलो. या यशाचे तुम्ही खरे शिल्पकार आहात. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मताधिक्य हे कणकवली तालुक्यातून मिळते. त्याची पुनरावृत्तीदेखील या विधानसभा निवडणुकीत झाली, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे राजकारण बदलते आहे. या बदलत्या राजकारणामध्ये तुम्हा- आम्हाला टिकायचे असेल तर पक्ष संघटना वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करावे लागणार आहे. काँग्रेस पक्षात जुना-नवा वाद राहिलेला नाही. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत कणकवली मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केले. त्यामुळे माझा विजय सुकर झाला. परंतु सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात कमी पडले. त्यामुळे त्याठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. देशात व काँग्रेसच्या विरोधात लाट असतानादेखील कणकवली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करून मला निवडून आणले आहे. ठाणे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसचा एकमेव मी आमदार निवडून आलो आहे. नारायण राणे यांचा झालेला पराभव मला जिव्हारी लागला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी एकदिलाने काम करूया, असे आवाहन राणे यांनी केले. निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मी कटीबद्ध आहे. मी जनतेच्या संपर्कात राहून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे काम करणार आहे, असे राणे म्हणाले. यावेळी सतीश सावंत, संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना, कणकवली मतदारसंघाच्या विकासासाठी येथील जनतेने आमदार राणेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. तसेच सिंधुदुर्गात काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी तुम्ही- आम्ही सर्वांनी मिळून संघटीतपणे काम करूया, असे आवाहन केले. यावेळी नीतेश राणेंचा सत्कार करण्यात आला. कणकवली तालुक्यातील मताधिक्य दिलेल्या बुधप्रमुखांचा नीतेश राणेंच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन कणकवली तालुका उपाध्यक्ष सुभाष सावंत यांनी केले. आभार उपसभापती बाबा वर्देकर यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) कणकवली तालुका काँग्रेसच्या बैठकीत नवनिर्वाचीत आमदार नीतेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतीश सावंत, संदेश सावंत, मेघा गांगण, आस्था सर्पे, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

Web Title: Nitesh Rane's cleanliness campaign without hindrance to traitors:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.