विकासप्रश्नी पाठपुरावा करणार : नीतेश राणे
By Admin | Updated: November 18, 2014 23:25 IST2014-11-18T22:01:49+5:302014-11-18T23:25:37+5:30
नगरपंचायतमध्ये घेतला आढावा

विकासप्रश्नी पाठपुरावा करणार : नीतेश राणे
कणकवली : शहरातील विकासकामे आणि समस्यांसंदर्भात राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले. नगरपंचायतींच्या सर्व नगरसेवक आणि प्रशासनासोबत आमदार राणे यांनी मंगळवारी चर्चा करून विकासकामांसंदर्भात आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले की, पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे नगरपंचायत प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना भेटून आढावा घेतला. शहराच्या विकासासंदर्भात भविष्यात काही निर्णय घ्यायचे आहेत. तसेच महत्त्वाची पावले उचलायची आहेत त्याअनुषंगाने आज चर्चा झाली. मुख्य सात- आठ विषयांसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात नगरपंचायत आणि शहरासंदर्भात महत्त्वाच्या विषयांवर आपण काही मुद्दे मांडणार आहोत. राज्यसरकारकडे शहरातील भुयारी गटार योजना, कर्मचारी आकृतिबंधाचा प्रश्न आदी प्रश्नांसाठी पाठपुरावा करू.
नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणे आवश्यक आहे. काही मुलभूत प्रश्न सुटल्यास बरेच अन्य प्रश्न मार्गी लागतील. नगरपंचायतीमध्ये कॉँग्रेसची सत्ता असून आमदारही कॉँग्रेसचा असल्याने एकत्रितरित्या सुनियोजितपणे काम केले जाईल. नगरपंचायतीच्या संदर्भात अजून साडेतीन वर्षे आमच्या हातात आहेत. स्वयंसेवी संस्थांनाही शहर विकासासाठी काम करताना सोबत घेतले जाईल. ‘ट्विटर’ वर केलेल्या वक्तव्याचे समर्थन करताना आमदार म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे फार मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी अनेकांच्या जीवनात बदल घडवला. त्यांना भारतरत्न मिळावा, हे योग्यच
आहे. (प्रतिनिधी)
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे आप्पा धर्माधिकारी यांना राज्यात स्वच्छता अभियानाचे दूत म्हणून नेमण्यात आले आहे.
प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राज्यभरात एकाच दिवसांत मोठ्या प्रमाणात स्वच्छतेचे काम केले.
त्यामुळे आप्पा धर्माधिकारी यांना ‘सिंधुदुर्ग भूषण’ पुरस्काराने गौरविले जावे, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे केल्याचे आमदार नीतेश राणे यांनी सांगितले.