नीतेश राणे २४ पासून दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर
By Admin | Updated: November 20, 2014 00:04 IST2014-11-19T21:46:26+5:302014-11-20T00:04:31+5:30
येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ते भेट देणार असून त्यांचे सांत्वन करणार

नीतेश राणे २४ पासून दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर
कणकवली : भाजप-शिवसेना अजूनही मानापमान नाट्यात रंगलेली असताना महाराष्ट्रापुढचे बरेच महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. याची प्रखर जाणीव असलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार नीतेश राणे यांनी मराठवाड्यातील दुष्काळी भागांचा दौरा आयोजित केला आहे.२४ नोव्हेंबरला राणे या दौऱ्यासाठी निघणार असून औरंगाबाद, कन्नड, खुल्दाबाद, गंगापूर, वैजापूर आदी तालुक्यांना ते भेट देणार आहेत. येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना ते भेट देणार असून त्यांचे सांत्वन करणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती भीषण असून शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा आखण्यात आला आहे. एकूण ७५ टक्के मराठवाड्यात २५ टक्क्यांहूनही कमी पाऊस झाला आहे. येथील शेतकरी अवकाळी पाऊस, गारपीटीने त्रस्त आहे. होणारे नुकसान आणि वाढणारे कर्ज याने येथील शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. येथील दुष्काळी भागांची पाहणी आमदार राणे स्वत: करणार असून तेथील ग्रामस्थांशी या संदर्भात चर्चा करणार आहेत. (प्रतिनिधी)