११५ ग्रामपंचायतींसाठी निर्मल अभियान
By Admin | Updated: November 2, 2014 23:30 IST2014-11-02T21:29:04+5:302014-11-02T23:30:35+5:30
कुडाळ तालुक्याचा आढावा : पांढरपट्टेंची तेंडोली, आंदुर्ले गावांना भेट

११५ ग्रामपंचायतींसाठी निर्मल अभियान
कुडाळ : कुडाळ तालुक्यामध्ये ११५ ग्रामपंचायती निर्मल व्हायच्या आहेत. ही गावे डिसेंबर २०१४ पर्यंत निर्मल करण्यासाठी शौचालय उभारावेत, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक यांना दिले आहेत. ते कुडाळ तालुक्यात आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी तेंडोली व आंदुर्ले या ग्रामपंचायतींना भेट दिली.
निर्मल भारत अभियानात कुडाळ तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींपैकी ४४ ग्रामपंचायती निर्मल झाल्या. २५ ग्रामपंचायती निर्मल व्हायच्या होत्या. त्यापैकी दहा ग्रामपंचायतींचे निर्मलसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्या ग्रामपंचायती लवकरच निर्मल पुरस्कारासाठी जाहीर होतील, अशी आशा जिल्हा परिषदेला आहे. दरम्यान, तालुक्यातील आंदुर्ले, गोवेरी, पाट-परबवाडा, तेंडोली, झाराप, तेर्सेबांबर्डे, माणगाव, नेरूर कर्याद नेरूर, हिर्लोक, जांभवडे, सोनवडे तर्फ कळसुली, कुपवडे, महादेवाचे केरवडे या ग्रामपंचायती अद्याप निर्मल झालेल्या नाहीत. गावामध्ये आवश्यक असलेले शौचालय सुध्दा उभारण्यात आलेले नाही. हे गाव निर्मल व्हावे, अशी गावातल्या ग्रामस्थांची मानसिकता नसली, तरी प्रशासकीय यंत्रणेची हे गाव निर्मल करण्याची इच्छा आहे. कारण हे गाव निर्मल न झाल्यास प्रशासनावर ठपका बसणार आहे. त्यामुळे प्रशासनातील कर्मचारी या ग्रामपंचायती निर्मल करण्यासाठी विशेष प्रयत्नरत आहेत. काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी तर या ग्रामपंचायती दत्तक घेऊन स्वच्छतेचे महत्त्व, शौचालयाचे महत्त्व आदीबाबत जनजागृती केली आहे.
काही धरणग्रस्त भागांमध्ये शौचालय बांधणीसाठी बऱ्याच शासकीय अटींचा अडसर येत आहे. पण काही ग्रामपंचायतींमध्ये अडचणी नसल्या, तरी गाव निर्मल करण्याची मानसिकता होत नाही. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी कुडाळ पंचायत समितीची भेट घेऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायती निर्मल झाल्या नसल्याचे दिसून आले. हे गाव येत्या डिसेंबरपर्यंत निर्मल करण्याठी प्रयत्न करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासमवेत कुडाळ तालुका गटविकास अधिकारी व्ही. एम. नाईक व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या पिंगुळी या जिल्हा परिषद मतदारसंघात ३ ग्रामपंचायती निर्मल आहेत. यामध्ये आंदुर्ले, पाट परबवाडा, तेंडोली या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायती निर्मल करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न सुरू आहेत. (वार्ताहर)