नीलेश राणे यांची नार्को टेस्ट करावी : सावंत
By Admin | Updated: May 22, 2016 00:46 IST2016-05-22T00:44:31+5:302016-05-22T00:46:57+5:30
राणे रातोरात आजारी कसे पडले?

नीलेश राणे यांची नार्को टेस्ट करावी : सावंत
चिपळूण : न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर माजी खासदार नीलेश राणे अचानक रातोरात आजारी कसे पडले? ते खोटे बोलत आहेत? त्यांची व आपली नार्को टेस्ट करावी, म्हणजे सत्य समोर येईल, अशी मागणी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी केली आहे.
माजी खासदार राणे यांनी सावंत यांना मारहाण केल्याप्रकरणी काल (शुक्रवारी) सकाळी राणे यांना अटक करण्यात आली. त्यानंतर चिपळूण न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. राणे यांच्या वकिलांनी चिपळूण कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे राणे यांना रात्रीच जिल्हा विशेष कारागृहात हलविण्यात आले. तेथे त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. रातोरात त्यांची तब्बेत कशी बिघडली? असा प्रश्न उपस्थित करुन त्यांची व आपली नार्को टेस्ट करावी म्हणजे कोण खरे बोलतेय व कोण खोटे बोलतेय हे सत्य समोर येईल.
या प्रकरणातील तपास योग्यरितीने व्हावा, ही आपली अपेक्षा आहे. तसे न झाल्यास आपण सीआयडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत.
वेळप्रसंगी विधानभवनासमोर उपोषण करण्याचीही आपली तयारी आहे, असेही संदीप सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)