नीलेश राणे यांची अखेर जामिनावर मुक्तता
By Admin | Updated: May 25, 2016 00:23 IST2016-05-24T23:05:11+5:302016-05-25T00:23:04+5:30
.काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण व मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना शुक्रवारी अटक केली होती.

नीलेश राणे यांची अखेर जामिनावर मुक्तता
रत्नागिरी : काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण व मारहाणप्रकरणी अखेर मंगळवारी सायंकाळी माजी खासदार नीलेश राणे यांची मुक्तता करण्यात आली आहे. रुग्णालयातून काही वेळ कारागृहात जाऊन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पाच वाजता ते मुक्त झाले आणि गाडीतून रवाना झाले.काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांचे अपहरण व मारहाणप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना शुक्रवारी अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
मात्र, त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. त्यामुळे त्यांना जिल्हा विशेष कारागृहात नेण्यात येत होते. मात्र, पोटात दुखत असल्याने त्यांना उपचारासाठी प्रथम कामथे उपजिल्हा रुग्णालय आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चिपळूण न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर खेड जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायालयात त्यांच्यावतीने अपील करण्यात आले. सोमवारी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर खेड न्यायालयाने राणे यांचा १५ हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्याचा सशर्त जामीन मंजूर केला. मंगळवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी खेड न्यायालयाचे आदेश घेऊन चिपळूण न्यायालय गाठले. दुपारच्या सत्रात चिपळूण न्यायालयासमोर हे कागदपत्र सादर झाले. तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते आदेश रत्नागिरीकडे आणण्यात आले.
दुपारी तीन वाजता राणे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेथून त्यांना पोलिस बंदोबस्तात जिल्हा विशेष कारागृहात नेण्यात आले.
कारागृहात कागदपत्रे सादर करण्यात आल्यानंतर दहा मिनिटांतच सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले. ४.४९ वाजता आदेश घेऊन आलेली गाडी कारागृहासमोर आली आणि ४.५८ ला राणे यांची सुटका करण्यात आली.
कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ताफ्यात नीलेश राणे त्यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानाकडे निघून गेले. यावेळी कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांची गर्दी
माजी खासदार नीलेश राणे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातून जिल्हा विशेष कारागृहात आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्यासमवेत कार्यकर्त्यांचा ताफा होता. कारागृहासमोर गाड्या लावून कार्यकर्ते चिपळूणहून कागदपत्रे घेऊन येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रतीक्षेत उपस्थित होते. चिपळूणहून कार्यकर्त्यांची गाडी कागदपत्रे घेऊन येताच कारागृहात कार्यकर्ते गेले. अवघ्या नऊ मिनिटांत कागदपत्रे सोपस्कार पूर्ण होऊन राणे बाहेर आले. राणे बाहेर येताच कार्यकर्त्यांनी घोषणा सुरू केल्या. कार्यकर्त्यांना अभिवादन करून राणे गाडीत बसले व बंगल्याच्या दिशेने निघून गेले. त्यांच्या पाठोपाठ कार्यकर्तेदेखील निघून गेले. राणे जिल्हा रुग्णालयातून कारागृहात येताच परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आज हजेरी लावणार
खेड न्यायालयाने राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्यांना दर बुधवारी चिपळूण पोलिस ठाण्यात हजेरी लावायची आहे. त्यामुळे आज, बुधवारी राणे चिपळूणला रवाना होतील.