निखिल नाईक, अमृत पाटील यांचा सत्कार
By Admin | Updated: February 26, 2015 00:14 IST2015-02-25T21:56:14+5:302015-02-26T00:14:40+5:30
आयपीएलमध्ये निवड : वेंगुर्ले काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील क्रीडा आयडॉलचा सन्मान

निखिल नाईक, अमृत पाटील यांचा सत्कार
वेंगुर्ले : सावंतवाडी येथील युवा क्रिकेटपटू निखिल नाईक यांची आयपीएलमध्ये निवड झाल्याबद्दल तसेच सिंधुदुर्ग जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष अमृत पाटील यांची राष्ट्रीय कुस्तीगीर पंच म्हणून निवड झाल्याबद्दल वेंगुर्ले तालुका काँग्रेसच्यावतीने आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी वेंगुर्ले काँग्रेसतर्फे आमदार नीतेश राणे यांचाही सत्कार करण्यात आला.
वेंगुर्ले कॅम्प मैदान येथे रविवारी क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार केला. यावेळी रणजी क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघात स्थान मिळविलेल्या निखिल नाईक यांची इंडियन प्रीमिअर लीगच्या पंजाब संघात वर्णी लागली आहे. तसेच कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान देणारे एनआयएस रेसलिंग कोच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे फिजिकल डायरेक्टर फिटनेस मसाजतज्ज्ञ अमृत पाटील यांची राष्ट्रीय कुस्तीगीर पंच म्हणून निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
क्रिकेटमध्ये भविष्य घडविण्यासाठी तरुणांनी स्वप्ने बघायला हवी. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे. पुढील वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रशिक्षक आणून आयपीएलच्या धर्तीवर सामने घेऊन क्रिकेटपटूंंना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार राणे यांनी केले. तरुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या टॅलेंटला संधी मिळावी व भविष्यात वेंगुर्लेचा विकास होण्यासाठी पर्यटन महोत्सव तसेच क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा हेतू आहे. रणजी, आयपीएल क्रिकेट संघात जिल्ह्यातील खेळाडंूना संधी देण्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे, असे आमदार राणे यांनी सांगितले.
यावेळी वेंगुर्ले काँगे्रसच्यावतीने आमदार राणे यांचा शाल, श्रीफळ व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस एम. के. गावडे, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, खजिनदार समीर कुडाळकर, उपसभापती स्वप्निल चमणकर, जयप्रकाश चमणकर, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)