कोकणातून नव्याने श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2015 01:19 IST2015-07-05T01:19:08+5:302015-07-05T01:19:31+5:30

कोकणातून नव्याने श्रीगणेशा

Newly born in Konkan | कोकणातून नव्याने श्रीगणेशा

कोकणातून नव्याने श्रीगणेशा

कोकण प्रांताचे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात वेगळे वलय राहिले आहे. बॅ. नाथ पैंपासून आजमितीपर्यंत अनेक अंगाने अनेकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला आहे. राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये गणती असलेल्या शिवसेनेची पाळेमुळे कोकणातच रोवली गेली आहे. नुकताच शिवसेनेने आपला सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन साजरा केला. परंतु शिवसेना पक्ष स्थापनेपासून आजतागायत सेनेचे कोकणाशी असलेले नाते कायमच अबाधित राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द प्रमाण मानून स्थापनेपासून आजतागायत शिवसेनेला उभारी देण्याचे काम कोकणातील कडवट शिवसैनिकांनी केले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे कोकणातील जनतेच्या कायमच पाठीशीही असायचे आणि दोन ते तीन वेळा ते येथील जनतेला नतमस्तकही झाले होते. शिवसेना ५0 वर्षानंतर आता दुसऱ्यांदा सत्तेत आली आहे. मात्र, यासाठी कोकणवासीयांची भूमिका महत्वाची ठरली आहे. हे जाणलेल्या मनसेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यामुळेच की काय आपली आगामी राजकीय कारकीर्द यशस्वीतेसाठी कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तब्बल आठवडाभर दौरा केला. राज ठाकरेंच्या या दौऱ्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण असून आगामी काळात मनसेचे इंजिन कोकणात सुसाट धावण्याची आशा निर्माण झाली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी काडीमोड घेत राज ठाकरे यांनी ७ वर्षांपूर्वी मनसेची स्थापना केली. स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार विधानसभेत गेले. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसेचे नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून आले. त्यामुळे अल्पकाळातच मनसेने मोठी गरूडझेप घेतली होती.
गतवर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मात्र मनसेचा वारू भरकटला. विधानसभा निवडणुकीत यावेळी फक्त एकच आमदार निवडून आला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला लोकांनी नाकारले आणि लोकसभेप्रमाणे भाजप-सेनेच्या पदरात मोठे मताधिक्य दिले. त्याचबरोबर पाचवा पक्ष म्हणून मनसेलाही याचा मोठा फटका बसला. त्यातच पक्षाचा झालेला पराभव आणि सत्ताधारी पक्षात जाण्याची मिळणारी संधी पाहून मनसेचे शिलेदार आमदार राम कदम, माजी आमदार दरेकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मनसेला भगदाड पडू लागले. मनसेचे आता काय होणार ? अशी चर्चाही रंगू लागली.
मनसेच्या आगामी राजकारणाची दिशा कशी असेल? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. राज ठाकरे यांनी राजकारणाचे बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून घेतले असल्याने त्यांची शैलीही बाळासाहेबांप्रमाणेच असल्याने ते मनसेचे आगामी राजकारण वेगळ्या पद्धतीने यशस्वी करतील. अशी मते काही जाणकारांनी व्यक्त केली होती. राज ठाकरेंचा नुकताच झालेला कोकण दौरा हा कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पुरताच मर्यादीत नव्हता. तर या दौऱ्यात त्यांनी आठ दिवसात कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात जाऊन तेथील प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न केला.
तसेच येथील भूमिपुत्रांच्या मनसे कायमच पाठीशी राहिल, असे आश्वासीतही केले. तर दुसरीकडे या दौऱ्यात त्यांनी कणकवलीत आपल्या निवासस्थानी असलेल्या व एकेकाळी शिवसेनेचे नेते म्हणून आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या राजकारणात सतत्त चर्चेत असलेल्या नारायण राणेंचीही भेट घेतली. ही भेट जरी औपचारीक असली तरी राज्यात आगामी राजकारण करत असताना किंवा आपल्या पक्षवाढीसाठी राज ठाकरेंची ही राजकीय खेळी असल्याचेही स्पष्ट झाले.
राज ठाकरेंना मनसेचा विस्तार करायचा आहे. मुंबईसह कोकण भागात आपली पाळेमुळे घट्ट करायची आहेत. मग त्यासाठी त्यांना मेहनत घ्यावी लागेल. येथील लोकांमध्ये जाऊन काम करावे लागेल हे हेरूनच आणि कोकणी जनतेला आवाहन करायचे असेल तर आधी त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल अशा काहीशा विचाराने तब्बल आठ दिवस कोकणात ठाण मांडून तसे प्रयत्न सुरू केले आहेत.
आगामी राज्याच्या राजकारणात यशस्वी यशाचे शिखर गाठायचे असेल तर मनसेला कोकणी माणसाला हाताशी धरावेच लागेल. तर आणि तरच ते शिवसेनेप्रमाणे पुढील काही वर्षांनी का होईना यशस्वी होवू शकतात. त्यामुळेच राज ठाकरेंनी आगामी राजकीय वाटचाल करताना कोकणातूनच नव्या राजकारणाचा श्री गणेशा केलाय. त्यामुळे ते शिवसेनेप्रमाणे एक दिवस यशस्वी होतील. यात काही शंका नाही.
मनसेचे कोकणातील नेतृत्व म्हणून सध्या माजी आमदार परशुराम उपरकर काम करत आहेत. परशुराम उपरकर यांची राजकीय कारकीर्द पाहता ते एक यशस्वी संघटक निश्चितच राहिले आहेत. नारायण राणे शिवसेनेत असताना १९९0 च्या दशकात सिंधुदुर्ग जिल्हा हा समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. तसेच त्यानंतर यातील काही नेतेमंडळीने काँग्रेसचे नेतृत्वही स्वीकारत राजकारण केले. मात्र, याच दशकात नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली राजकारणात नव्याने दाखल झालेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख असताना कुशल नेतृत्वाने शिवसेनेची संघटना बांधली होती.
त्या काळात शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून परशुराम उपरकर यांनी अनेक युवा कार्यकर्ते घडविले होते. तसेच संघटना बांधणीसाठी त्यांनी अहोरात्र मेहनतही घेतली होती. परशुराम उपरकर आणि राजन तेली हे दोन नेते त्यावेळी नारायण राणे यांचे डावे आणि उजवे हात म्हणून कार्यरत होते. मात्र, नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राजकीय घडी विस्कटली. परशुराम उपरकर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. तर राजन तेली राणेंसमवेत जावून विधानपरिषदेवर आमदार झाले.
नारायण राणे काँग्रेसचे उमेदवार असल्याने त्या काळात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून कोणीही लढण्यास तयार नव्हते. मात्र, परशुराम उपरकर यांनी धाडस दाखवत राणेंच्या विरोधात निवडणूक लढविली. त्यावेळी त्यांचे जरी डिपॉझीट जप्त झाले मात्र, राणेंविरोधात लढल्याने त्यांचीही विधान परिषदेवर वर्णी लागली. त्यांनाही आमदारकीची लॉटरी लागली. काळाच्या ओघात काँग्रेसकडून सहा वर्षांनंतर राजन तेलींना उमेदवारी मिळाली नाही. तशी शिवसेनेकडून उपरकरांनाही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत मनसेमध्ये प्रवेश केला.
परशुराम उपरकर हे शिवसेनेत असताना कायमच भारतीय विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे यांच्या कायमच जवळ राहिले होते. त्यामुळे शिवसेनेनंतर त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंच्या पाठीजाण्याचा निर्णय घेतला. आता राज ठाकरेंनी उपरकर यांच्याकडे कोकणाची जबाबदारी दिली आहे. उपरकर हे संघटना बांधणीसाठी अत्यंत हुश्शार मानले जातात. त्यामुळे शिवसेनेत राणे असताना ते त्यांच्या खूप जवळ असायचे. आता पक्षाध्यक्ष असलेल्या राज ठाकरेंच्या उपरकर खूप जवळ आहेत. ते त्यांच्या कोकणातील दौऱ्याने स्पष्ट झाले. शिवसेनेत असताना संघटना बांधणीसाठी परशुराम उपरकर यांना जशी रसद पुरविण्यात आली होती. तशी रसद जर मनसेने उपरकरांना पुरविली तर निश्चितच मनसेचे इंजिन कोकणात आगामी काळात धडाडण्यास मदत होईल. कोकण जिंकल्यावर राज ठाकरेंना महाराष्ट्र जिंकणे अवघड जाणार नाही.

Web Title: Newly born in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.